मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले मार्गदर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल येथे अधिवक्ता परिषद रायगड आणि पनवेल वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 8) अधिवक्ता कार्यशाळा 2025 आयोजित करण्यात आली होती. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यशाळेला लाभली.
या कार्यशाळेचे आयोजन पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. कार्यशाळेत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्यावरील मुद्दे आणि त्याची पार्श्वभूमी यावर मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी उपस्थितांसोबत सखोल संवाद साधला.
देशभरातील दुर्गम भागांतून सुरू झालेला नक्षलवाद आता शहरी भागात फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून पोहचला आहे. न्यायालयीन परिभाषेत माओवादी कडवे-डावे म्हणून ओळखल्या जाणार्या गटांनी नवीन चेहर्यातून समाजातील भावनांचा गैरवापर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर अशा संघटनांवर बंदी आणण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केली असून केंद्र सरकारनेही त्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या अभिप्रायांपासून ते संयुक्त विधेयक समितीपर्यंत व्यापक विचारविनिमय करून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा तयार केला असल्याचे मंत्री अॅड. शेलार यांनी सांगितले. या कायद्याचे संविधानिक अधिष्ठान, देशहिताशी असलेली सांगड आणि मानवी सुरक्षेच्या दृष्टीने असलेले महत्त्वही त्यांनी सविस्तरपणे नमूद केले.
अधिवक्ता परिषद रायगड आणि पनवेल वकील संघटना वर्षभर विविध उपक्रम राबवत नागरिकांना दिशा देत असल्याचे नमूद करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी दोन्ही संघटनांचे कौतुक केले.
या कार्यशाळेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व सदस्य अॅड. पारिजात पांडे, अधिवक्ता परिषद कोकण प्रांत पालक अॅड. दीपक गायकवाड, अध्यक्ष अॅड. संजीव गोरखाडकर, सचिव अॅड. रेखा कांबळे, रायगड जिल्हा अध्यक्ष व जिल्हा सरकारी वकील अॅड. संतोष पवार, अकोला प्रांत अधिवक्ता परिवार सचिव अॅड. मीराम नेसर, पनवेल अध्यक्ष अॅड. राजेंद्र देशमुख, पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ, सचिव अॅड. प्रल्हाद खोपकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper