Breaking News

पनवेलमध्ये ‘कोरोना’ची अफवा

पनवेल, अलिबाग : प्रतिनिधी

काही लोक कोरोना विषाणूबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत. पनवेलमध्ये असा एकही संशयित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

चीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे सहा संशयित रुग्ण रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये आढळले आहेत. इराण येथून हे लोक पनवेल येथे आपल्या घरी आलेत, असे वृत्त शुक्रवारी (दि. 6) पसरले होते, मात्र ही अफवा असल्याचे पनवेल महापालिकेचे आयुक्त देशमुख यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

परदेशातून दररोज येणार्‍या नागरिकांची विमानतळावर तपासणी होते आणि हे नागरिक महाराष्ट्राच्या विविध भागांत जातात. त्यांचा राहण्याचा पत्ता नमूद केला जातो. यापैकी पनवेल शहरात आलेल्या नागरिकांची महापालिकेच्या वतीने विचारपूस व तपासणी केली जाते. या क्षणापर्यंत पनवेलमधील एकाही नागरिकामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असे सांगून अफवा पसरविणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त देशमुख यांनी दिला आहे.

-असमन्वयामुळे झाला घोळ!

पनवेलमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्याची अफवा असमन्वयामुळे पसरल्याचे समोर आले आहे. याबाबत रात्री उशिरा निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे आणि प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. इराणवरून आलेल्या लोकांवर लक्ष ठेवा, असा संदेश त्यांना प्राप्त झाला होता, मात्र या नागरिकांना ‘कोरोना’ झाल्याचे वृत्त पसरले, परंतु त्यांना तशी लागण झालेली नसल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी गर्दीच्या, समारंभाच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच होळी सणाला बाहेर पडू नये. संशयित रुग्ण आढळल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधावा.

-निधी चौधरी, रायगड जिल्हाधिकारी

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply