पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी (दि. 18) कोरोनामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 12 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात 271 रुग्ण झाले असून, 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये सात नवीन रुग्ण आढळले. त्यात पाली देवद (सुकापूर) येथील एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह एका व्यक्तीचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे 385 रुग्ण झाले आहेत, तर 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील 19, माणगावमधील पाच, उरणमधील दोन आणि कर्जत व अलिबाग येथील प्रत्येकी एक रुग्ण मिळून कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 546 झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कळंबोली सेक्टर 11 येथील गुरु कुटीर कॉम्प्लेक्स सोसायटीतील 35 वर्षीय व्यक्तीचा आणि कामोठे सेक्टर 11 येथील महादेव पाटील सोसायटीतील 57 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कामोठ्यात सात रुग्ण आढळले आहेत. से. 11 येथील महादेव पाटील बिल्डिंगमध्ये राहणार्या व सायन येथे बेस्टमध्ये रोखपाल असलेल्या व्यक्तीच्या घरातील तीन जणांना कोरोना झाला आहे. त्याला यापूर्वीच कोरोनाची लागण झालेली आहे. से. 10 मधील रहिवासी आणि जेएनपीटी येथे कार्यरत असलेल्या व पूर्वीच लागण झालेल्या व्यक्तीच्या घरातील दोन व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सेक्टर 17 मधील रहिवासी व जे.जे. हॉस्पिटलमध्ये असलेल्या नर्सला आणि सेक्टर 5 मधील मुंबई महापालिकेत सफाई कामगार असलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे.
खारघर सेक्टर 15 घरकुलमधील मातृछाया सोसायटीत राहणार्या व जिओ कंपनीत घाटकोपर येथे अभियंता असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या घरातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सेक्टर 20 हावरे गुलमोहरमध्ये राहणार्या व पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचार्याला कोरोनाची लागण झाली आहे. कळंबोली सेक्टर 15 येथील पाम विहार सोसायटीत राहणार्या व तुर्भे येथे वाहतूक पोलीस असलेल्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारपर्यंत 1912 कोरोना टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 271 पॉझिटिव्ह असून, 70 टेस्टचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आजपर्यंत 125 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, 136 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी खारघर आणि कामोठ्यातील प्रत्येकी तीन, कळंबोलीतील दोन आणि पनवेल व नवीन पनवेलमधील प्रत्येकी एक व्यक्ती पूर्ण बरी झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले.
पनवेल ग्रामीणमध्ये सोमवारी सात नवीन रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये पाली देवद (सुकापूर) येथील न्यू कार्तिक सोसायटीतील एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह एका व्यक्तीला संसर्ग झाला आहे. या कुटुंबातील एका व्यक्तीला यापूर्वी लागण झाली आहे. साई कृपा सोसायटीतील रहिवासी व वाशी पीकेसी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. करंजाडे येथे राहणार्या व नायगाव पोलीस मुख्यालयात काम करणार्या पोलिसाचा, विचुंबे आणि उमरोली येथील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत एकूण 114 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 27 जणांनी कोरोनावर मात केली असून, 84 जणांवर उपचार सुरू आहेत, तर तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper