महापालिकेची विविध पथकांद्वारे अंमलबजावणी
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
पनवेल महापालिका क्षेत्रात 1 जुलै 2022पासून एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधित प्लास्टिकची साठवणूक विक्री आणि वापर करणार्यांवर महापालिकेच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील व्यावसायिकांकडे प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा असल्याची माहिती नागरिकांनी महापालिकेला द्यावी, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त कैलास गावडे यांनी केले आहे. नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदीविषयी जनजागृती निर्माण करण्याकरिता महापालिकेच्यावतीने विविध एनजीओची मदत घेतली जाणार असून नुकतीच विविध एनजीओच्या पदाधिकार्यांची एक बैठक मुख्यालयात घेण्यात आली. प्लॅस्टिक बंदी बद्दल नागरिकांचे प्रबोधन करण्याकरिता या वेळी चर्चा करण्यात आली. या पदाधिकार्यांनी या कामी महापालिकेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्लास्टिक बंदीची अमंलबजावणी करण्याकरिता महापालिकेच्या वतीने चारही प्रभागामध्ये विविध पथके तयार करण्यात आली आहे. ही पथके त्या त्या ठिकाणी असणार्या सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. या कारवाईमध्ये पहिला गुन्हा नोंद झाल्यावर पाच हजार रुपये, दुसरा गुन्हा नोंद झाल्यावर 10 हजार रुपये, तिसरा गुन्हा नोंद झाल्यावर 25 हजार रुपये दंड आणि तीन महिन्याचा कारावास असणार आहे.
संबंधित उत्पादनावरही बंदी
महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018अंतर्गत खालील अतिरिक्त एकल वापर प्लॅस्टिकचा वापर मार्च2018 पासूनच प्रतिबंधित आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स) – हॅडल असलेल्या व नसलेल्या कंपोस्टेबल व प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून) सर्व प्रकारच्या नॉन-ओव्हन बॅग्स (पॉलीप्रोपिलीन पासून बनविलेले), एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन – डिश, बाउल, कॅन्टेनर (डबे) (हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगकरीता) यावरती बंदी असणार आहे. प्लास्टिकच्या कांडयासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकचे झेंडे, आईस्क्रीम कांडया. सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल) यावरती बंदी असणार आहे. प्लेटस, कप, ग्लासेस, काटे, चमचे चाकू, स्ट्रॉ, ट्रे, स्टिरर्स, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकीटाभोवती प्लास्टिक फिल्म, बॅनर (100 मायक्रॉन पेक्षा कमी) यावर बंदी असणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper