पनवेल : रामप्रहर वृत्त
गजल सागर प्रतिष्ठान, मुंबई आणि गजल ग्रुप, पनवेल यांच्या वतीने रविवारी (दि. 25) सुप्रसिद्ध गजलकार व गजल चळवळीतील साथी स्वर्गीय लक्ष्मण जेवणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला तरही मुशायरा आणि पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. या वेळी ‘साहित्यसंपदा’ने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण आणि पुरस्कार वितरणही करण्यात आले.
पनवेल येथील शासकीय बीएड कॉलेज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ गजलकार मधुसूदन नानिवडेकर उपस्थित होते, त्याबरोबरच सेल्स टॅक्सचे उपायुक्त प्रमोद भोसले, ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. मनिषा बनसोडे, साम टीव्हीचे दुर्गेश सोनार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंदीकर, गजल सागर प्रतिष्ठानचे गजल नवाज भीमराव पांचाळे, गजल ग्रुपचे प्रमुख ए. के. शेख, साहित्यसंपदा समूहाचे वैभव धनावडे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी स्वर्गीय लक्ष्मण जेवणे यांच्या स्मरणार्थ तरही मुशायरा रंगला. मधल्या वेळेत ए. के. शेख यांच्या ‘गजल एके गजल’ या पुस्तकाची तृतीय आवृत्ती, संदीप बोडके यांच्या ‘उजळली सांजवेळ’ची दुसरी आवृत्ती, दिवाकर वैशंपायन यांचे ‘गजल वेलीवरील फुले’, ‘कौशल’ श्रीकांत पेटकर यांचे ‘कविता संदर्भ असलेल्या’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी साहित्यसंपदा समूहातर्फे ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांना ‘महाराष्ट्र साहित्यरत्न’ हा पुरस्कार देण्यात आला, तसेच संदीप बोडके यांच्या ‘उजळली सांजवेळ’ या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीला ‘पुस्तकरत्न’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्यसंपदा समूहाने घेतलेल्या विविध साहित्यिक स्पर्धांतील विजेत्यांची पारितोषिके या वेळी देण्यात आली. यानंतर उर्वरित मुशायरा उत्साहात झाला.
या वेळी झालेल्या तरही मुशायर्यामध्ये नाशिकहून रमेश सरकाटे, बार्शीहून शब्बीर मुलाणी, पुण्याहून मसूद पटेल, सुभाष पवार, रोहिदास पोटे, आबिद मुनशी, दिवाकर वैशंपायन, प्रभाकर गोगटे, सदानंद रामधरणे, डॉ. अविनाश पाटील, संजिव शेट्ये, रवींद्र सोनावणे, मीनल वसमतकर, पूजा नाखरे, रंजना करकरे, ज्योती शिंदे आदी गजलकारांनी सहभाग घेतला. समीर शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर रोहिदास पोटे यांनी आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper