पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात असून या अनुषंगाने महपालिका क्षेत्रातील नागरिकांची सध्याची आरोग्य स्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी नागरिकांनी फोन तसेच वेबलिंकद्वारे आपली माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. आरोग्य सर्वेक्षणांतर्गत नागरिकांच्या मोबाइलवर 022-35155022 या दूरध्वनी क्रमांकावरून फोन येतो. यामध्ये सध्याच्या आरोग्य स्थितीविषयी प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांची उत्तरे होय असेल तर 1 नंबर आणि नाही असेल तर 2 नंबर दाबून द्यायची आहेत. याशिवाय महापालिकेने ही https://forms.gle/ Q52Keiea7XokLRLPA ही वेबलिंकही प्रसारित केली असून नागरिकांनी या वेबलिंकवर जाऊन आपली आरोग्यविषयक माहिती त्यामध्ये नोंदवायची आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचाराचे नियोजन करणे सोयीचे होणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी म्हटले आहे.
झोराबियन चिक्स कंपनीचा ग्रामपंचायतींना मदतीचा हात

खोपोली ः प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील मानकीवली ग्रामपंचायत हद्दीतील डोलवली येथील झोराबियन चिक्स प्रा. लि. कंपनीने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी व आदिवासी तसेच गरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी परिसरातील बीडखुर्द, जांबरूंग, नावंढे, मानकीवली, खानाव व चिलठण या ग्रामपंचायतींना भरघोस आर्थिक मदतीचा हात दिला आहे. दरम्यान, खालापूर तालुक्यातील परिसरातील अनेक गावांना या कंपनीने नेहमीच मदतीचा हात दिल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. झोराबियन कंपनीत 500 कर्मचारी काम करीत असून कोरोनामुळे दूरवरून न येऊ शकणार्या कामगारांना कंपनीने आवारातच राहण्याची व जेवणाची सोय केली आहे. या कंपनीबद्दल सर्वांमध्ये आपुलकीची भावना दिसून येते. नेहमीच सर्वधर्म समभाव जोपासणार्या कंपनीच्या गणपती उत्सवाची जिल्ह्यात चर्चा असते.
RamPrahar – The Panvel Daily Paper