पनवेल : सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीनुसार पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे ‘महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय’ नामकरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अनेक दशकांपासून आध्यत्मिक, सामाजिक क्षेत्रात अविरतपणे मौलिक कार्य सुरू आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला संस्कारी दिशा देण्याचे काम थोर समाजसुधारक दिवंगत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी, तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी व कुटुंबीयांच्या माध्यमातून होत आहे. त्यांच्या कार्याचा जगभर गौरव आणि आदर्श आहे. त्या अनुषंगाने नव्याने कार्यान्वित झालेल्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयास डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार शासनाने अध्यादेश काढला असून, आता पनवेलचे हे रुग्णालय महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय या नावाने ओळखले जाणार आहे.
मागणी मान्य केल्याबद्दल सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper