पनवेल : वार्ताहर
पनवेल परिसरात फसवणूक करून पैसे व ऐवज लुबाडून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. यासाठी लुटारू विविध युक्त्या करीत समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून लुटमार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. नुकत्याच पनवेलमध्ये व खारघरमध्ये अशा घटना घडल्या आहेत. पोलीस या लुटारूंचा शोध घेत असून फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेत. पहिल्या घटनेत मोटरसायकलला धडक दिल्याचा बहाणा करून एका टोळीने मुंबईतील एका व्यावसायिकाची कार भररस्त्यात अडवून त्यांच्या कारमध्ये असलेली पाच लाख रुपयांची रोख रक्कम लुटून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. खारघर पोलिसांनी या टोळी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील तक्रार गुरुचरणलाल मारवा (रा. चेंबूर) यांचा कळंबोलीतील स्टील मार्केटमध्ये ऑटोमोबाईल स्पेअर पार्टसचा व्यवसाय आहे. मारवा एपीएमसी मार्केटमधील मित्राकडून पाच लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन आपल्या कारने कळंबोली येथे जात होते. या वेळी त्यांनी ही रक्कम आपल्या कारमधील डॅश बोर्डमध्ये ठेवली होती. ते खारघरजवळ फणसवाडी येथे आले असताना त्यांच्या पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांची कार अडवून त्यांच्या कारने एका मोटरसायकलला धडक दिल्याचे व ते पाठीमागे उभे असल्याचे सांगितले. त्यामुळे मारवा ते पहायला गेल्यावर त्यांना एका महिलेने त्यांच्या कारची धडक लागल्यामुळे जखमी झाल्याचे सांगून त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. याच वेळी मारवा यांच्या कारजवळ उभ्या असलेल्या दोघा लुटारूंनीकारच्या डॅश बोडमध्ये ठेवलेली पाच लाखांची रोख रक्कम लुटून पलायन केले. कारजवळ आल्यानंतर मारवा यांना कारमधील रक्कम चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसर्या घटनेत पनवेल रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका लुटारूने कामावरून घरी जाणार्या व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्याचा मोबाइल व रोख रक्कम लुटून पलायन केल्याची घटना पनवेल रेल्वे स्थानकाजवळ घडली. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात लुटारूविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील तक्रारदार भास्कर ढेकले (वय 40, रा. आकुर्ली, पनवेल) हे सकाळ मीडियाच्या तळोजा येथील प्रेसमध्ये सीटीपी प्रोसेस ऑपरेटर म्हणून काम करतात. कामावरून सुटल्यानंतर घरी जात असताना एका लुटारूने तंबाखू मागण्याच्या बहाण्याने त्यांना अडविले. ढेकले यांनी त्याला नकार दिल्यानंतर लुटारूने मारहाण करून मोबाइल, रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. ढकले यांनी विरोध केल्यानंतर लुटारूने डेब्रिजमधील सिमेंटचा ब्लॉक उचलून त्यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांचा मोबाइल व रोख रक्कम लुटून त्या ठिकाणावरून पळ काढला. या मारहाणीत ढेकले गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम श्री हॉस्पिटलमध्ये व त्यानंतर लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी ढेकले यांचा रुग्णालयात जबाब घेऊन अज्ञात लुटारूविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच त्याचा शोध सुरू केला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper