Breaking News

पनवेल मनपातर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

कुटुंब रंगलंय काव्यात कार्यक्रमाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीतील प्रसिद्ध कवी, नाटककार कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या वतीने प्रा. विसूभाऊ बापट यांच्या ’कुटुंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी (दि. 27) करण्यात आले. या वेळी माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरणपूरक गणपती उत्सव स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, उपायुक्त कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने उपस्थित होते. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, कवी कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव भारतभर पसरविले. त्यांच्या कवितेतून स्फुर्ती घेऊन आपण पुढे पाऊल टाकत राहू. पनवेल महापालिकेला माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. हा गौरव मिळवून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा महापालिका सन्मान करते आहे ही अभिनंदनीय बाब आहे. पनवेल शहराला अधिक सुंदर बनविण्यामध्ये या सर्वांचा हातभार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रा. विसूभाऊ बापट यांच्या कुटुंब रंगलय काव्यात या कार्यक्रमाला श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कवितेमधील विविध भावनांचे सादरीकरण त्यांनी केले. यामध्ये ‘बाप्पा तुम्ही याहो खूप खूप दिवस रहायला’ अशा बालकवितांपासून ते तरुणाईला भुरळ घालणार्‍या मंगेश पाडगावकरांच्या ‘त्याने प्रेम केले, तुमचे काय गेले’ अशा अनेक कविता सादर केल्या तसेच शायर भाऊसाहेब पाटणकरांच्या ‘सांगेन काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे, तो कविचा मान तितुकी पायरी माझी नव्हे’ अशा शायरीपासून ते चारोळ्यापर्यंत कवितेच्या अनेक प्रकारांचे प्रा. बापट यांनी सादरीकरण केले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवींबरोबरच अपरिचित कविंच्या कविता सादर करताना कवितेमागील अनेक किस्से, आठवणी त्यांनी सांगितले.
या वेळी पनवेल महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यांतर्गत घेण्यात आलेल्या काव्य वाचन स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा अंतर्गत वैयक्तिक स्तरावरील दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस गणेशोत्सव विजेते व दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवामधील विजेत्या मंडळांना बक्षीस वितरण करण्यात आले. महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवांदरम्यान कृत्रिम तलावामध्ये गणेश विसर्जन उपक्रमासाठी ज्या शाळा, महाविद्यालयांनी सहकार्य केले त्या शाळा, महाविद्यालयांचा या वेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, नाट्यगृह विभाग प्रमुख राजेश डोंगरे, बक्षीस विजेते गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, एनजीओ प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी नगरसचिव अक्षय कदम यांच्या हस्ते विसुभाऊ बापट यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ओमप्रकाश साळस्कर यांनी तबल्यावर उत्तम साथ दिल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त कैलास गावडे यांनी केले, तर आभार डॉ. राजू पाटोदकर यांनी मानले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply