पनवेल ः प्रतिनिधी
महापालिकेने यापूर्वी घोषित केलेले कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी विविध व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहतील, असा आदेश देण्यात आला होता. त्यात सुधारणा करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी पत्रक काढून दिली आहे. त्याप्रमाणे अत्यावश्यक वस्तूंव्यतिरिक्त अन्य पाच एकल आस्थापनेला परवानगी दिली आहे. एक रस्ता किंवा गल्लीत अशा प्रकारच्या जास्तीत जास्त पाच दुकानांनाच प्रति एक किमीप्रमाणे मुभा असेल.
अशा दुकानांची संख्या जास्त असल्यास प्रभाग अधिकारी कोणती दुकाने उघडी ठेवता येतील याचा निर्णय घेतील. दुकाने सुरू करताना सामाजिक अंतर राखण्याची जबाबदारी प्रत्येक दुकानदाराची असणार आहे. दुकानदारांना मास्क, सॅनिटायझर, ग्लोज तसेच ओळखपत्र घालणे अनिवार्य राहणार आहे. विशेष म्हणजे दुकानदारांनी ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्यापारी संकुले तसेच मॉल्सवरील निर्बंध यामध्ये कायम राहणार आहेत. पनवेलमध्ये रेड झोन असल्याने पहिल्या टप्प्यात फक्त काही व्यवसायांनाच परवानगी देण्यात आली आहे.
सोमवार व शुक्रवार : स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, हार्डवेअर, बांधकाम साहित्य, स्टील, सिमेंट ट्रेडर्स, पावसाळी प्रावरणे (उदा. ताडपत्री, प्लास्टिक बंदी नसलेले प्रावरण) आणि झेरॉक्स सेंटर्स.
मंगळवार व शनिवार : ऑटोमोबाइल्स दुकाने, वर्कशॉप, वाहन गॅरेज, सर्व्हिसिंग सेंटर, फूटवेअर आणि ऑप्टिक्स.
बुधवार व रविवार : इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री व दुरूस्ती दुकाने, मोबाइल विक्री, कॉम्प्युटर, गॅस, कुकर, मिक्सर, एसी दुरूस्ती आदींसह भांड्यांची दुकाने आणि वखार.
गुरुवार : होजिअरी, रेडिमेड गारमेंट्स दुकाने, कपड्यांची दुकाने, (शोरूम्स वगळून).दरम्यान, जिम, स्विमिंग पूल तसेच मॉल्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोविडचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने या आस्थापनांना या निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारची सूट नसेल.
Check Also
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper