Breaking News

पनवेल महापालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींचे सर्वेक्षण करून दुरूस्तीसह अत्यावश्यक सुविधांची पूर्तता करा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींचे सर्वेक्षण करून दुरूस्ती व अत्यावश्यक सुविधा पुरवण्याची मागणी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिका हद्दीतील विविध ठिकाणी असलेल्या स्मशानभूमींची सद्यस्थिती अत्यंत जीर्ण झालेली आहे. दुरूस्तीअभावी तेथे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी, शेड, विद्युत दिवे, रस्ते, बसण्यासाठी बाकडे व स्वच्छतागृह अशा अत्यावश्यक सुविधादेखील अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे अंत्यविधीकरिता येणार्‍या नागरिकांना नादुरूस्त स्मशानभूमी व त्या ठिकाणी असलेल्या अपुर्‍या सोयीसुविधांमुळे गैरसोयीस सामोरे जावे लागते. त्या ठिकाणी आवश्यक सुविधा असणे ही महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे, असे नमूद करून मनपा हद्दीतील सर्व स्मशानभूमींची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी; सर्व स्मशानभूमींमध्ये पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, शेड, बसण्यासाठी बाक, स्वच्छतागृहे इत्यादी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात; स्मशानभूमी परिसर स्वच्छ व सुरक्षित राहिल यासाठी नियमित देखभाल व देखरेखीसाठी आवश्यकती यंत्रणा नेमण्याची व्यवस्था करण्यात यावी; स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी योग्य व दुरूस्त असा रस्ता बनविण्यात यावा अशा सुविधा सूचविल्या आहेत.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल महापालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींचे सर्वेक्षण करून दुरूस्ती व अत्यावश्यक सुविधा पुरविण्याकरिता योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply