माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त
यंदा लवकर सुरू झालेल्या आणि लांबलेल्या पावसाने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील अशा खराब झालेल्या रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदारांनी कोणतेही बिल न देता नव्याने करून द्यावी, असे निर्देश महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिले आहेत.
पनवेल महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांच्या दालनात रस्त्यांच्या कामांसंदर्भात शनिवारी (दि. 18) महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत यांच्यासह व्हीडीआयपीएल, पीडीआयपीएल, टीआयपीएल, जेएमएम आयपीएल, पी.पी. खारपाटील कन्स्ट्रक्शन, झेनिथ, श्रीकृष्ण या कंपन्यांचे मालक, अभियंते उपस्थित होते.
या वर्षी वेळेआधीच मे महिन्यात पावसाने हजेरी लावली आणि हा पाऊस परतीच्या प्रवासात लांबला. त्याचा पावसाचा परिणाम रस्त्यांवरही झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत पावसामुळे जे रस्ते खराब झाले आहेत त्यांची कामे संबंधित कंत्राटदारांनी नव्याने करून देण्याचे निर्देश माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बैठकीत दिले. अभियंत्यांच्या देखरेखीखाली चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करावे, असेही त्यांनी सूचित केले. उपस्थित सर्व कंत्राटदारांनी ते मान्य केले असून लवकरच रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper