सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे मत
पनवेल ः प्रतिनिधी
खेळाडूंना चांगली संधी, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पनवेल महापालिका हद्दीमध्ये खेळासाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निश्चितच प्रयत्न करू, तसेच सिडकोच्या माध्यमातून सिडको नोडमध्येही सीझन क्रिकेट खेळता येईल असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात येईल, असा विश्वास सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
आम्हाला खेळांसाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून द्या, अशी मागणी पालक आणि खेळाडू करीतच आहेत. त्यामुळे खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करून उत्तम खेळाडू देशाला देणे आपले कर्तव्य आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या माध्यमातून पनवेलमध्ये अंडर 23 टी-20 पनवेल प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 12) करण्यात आले. हे सामने 19 मेपर्यंत सुरू राहणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील लेदर क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या माध्यमातून पनवेलमध्ये अंडर 23 टी-20 पनवेल प्रीमिअर लीग स्पर्धा घेण्यात येत आहे. ही स्पर्धा महात्मा फुले कॉलेज, पनवेल अर्थात एएससी महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. या लीगमधून जमा होणारा निधी खेळाडूंच्या विकासासाठी उपयोगात आणला जाणार आहे. या वेळी पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अॅकॅडमी अध्यक्ष रवींद्र नाईक, पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अॅकॅडमी मुख्य प्रशिक्षक सागर कांबळे, पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अॅकॅडमी पालक प्रतिनिधी रतन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper