पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक 2026 निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. या निवडणुकीत भाजप महायुतीच्या एकूण 59 उमेदवारांनी विजय मिळवत पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेवर भक्कम सत्ता स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.25) नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीच्या गटनेतेपदी नितीन जयराम पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.
या बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रकाश बिनेदार यांच्यासह महायुतीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सर्व उपस्थितांनी गटनेते नितीन पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपचे 55, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन असे एकूण 59 उमेदवार विजयी झाले आहेत. जनतेने महायुतीवर दाखवलेल्या विश्वासामुळे विकासाभिमुख आणि स्थिर प्रशासनासाठी पुन्हा एकदा भाजप महायुतीला कौल मिळाल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले. महायुतीच्या गटनेतेपदी नितीन पाटील यांची निवड झाल्यानंतर बुधवार, 28 जानेवारी रोजी कोकण आयुक्त कार्यालयात महायुतीची अधिकृत गट नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर महापौर व उपमहापौर पदांसाठी 10 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरेल असे काम पुढील काळात करण्यात येईल, असा विश्वास या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. तर गटनेता म्हणून दिलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासाने पार पाडू, असा विश्वास नितीन पाटील यांनी व्यक्त केला.
Check Also
द्रोणागिरी महोत्सवाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली भेट
उरण : रामप्रहर वृत्तउरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथे आई शांतेश्वरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित द्रोणागिरी …
RamPrahar – The Panvel Daily Paper