Breaking News

पराभवाचा सोहळा

पश्चिम बंगालमधील भाजपचा पराभव विरोधकांना इतका आनंदित करून गेला की या रणांगणामध्ये आपल्याकडील उरलेसुरलेदेखील गायब झाले आहेत याचेही भान विरोधकांना राहिले नाही. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत तब्बल 77 जागा जिंकल्या. गेली पाच वर्षे पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजपचे अवघे तीन आमदार होते. त्या तीनचे आता पाऊणशेच्या वर संख्याबळ झाले आहे. साहजिकच बंगालच्या भूमीतील भाजपच्या मतांची टक्केवारीदेखील प्रचंड वाढली आहे. याला पराभव कसे म्हणावयाचे? यानिमित्ताने उजव्या विचारसरणीचा एक नवा कालखंड बंगालच्या भूमीमध्ये सुरू झाला असेच म्हणावे लागेल. स्वत: कमावण्याजोगे काही उरले नाही की एखादी व्यक्ती दुसर्‍याच्या नुकसानामध्ये आसुरी आनंद शोधू लागते. हा विघ्नसंतोषीपणा काँग्रेस पक्षात पुरेपूर भरला आहे. अशा विषारी राजकारणामुळेच काँग्रेसला देशभरातील जनतेने नाकारले. काँग्रेसच्या नादाला लागून अन्य विरोधी पक्षदेखील तशाच प्रकारचे हिणकस राजकारण करू लागतात, तेव्हा सुजाण नागरिकांना दु:ख होते. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाच्या जबरदस्त आक्रमणाला यशस्वी तोंड देत नेत्रदीपक विजय मिळवला. या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. त्यांच्यामुळेच तृणमूल काँग्रेसला विजयाची हॅट्ट्रिक साधता आली. ममता बॅनर्जी यांच्याखेरीज तृणमूलच्या भरघोस यशाचे श्रेय कुणालाही देता येणार नाही. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलखुलासपणे ममतादीदींचे अभिनंदन केले. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात आरोप-प्रत्यारोपांची प्रचंड राळ उठली होती. वातावरण अतिशय कडवट झाले होते, परंतु निवडणुकीची रणधुमाळी आटोपली की हा कडवटपणा विसरून आपापल्या कर्तव्याला लागायचे असते हा वस्तुपाठच पंतप्रधानांनी घालून दिला. ही खिलाडूवृत्ती हल्ली राजकारणात अभावाने दिसते. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांची दयनीय अवस्था झाली. दशकभरापूर्वीपर्यंत या दोन्ही पक्षांचा वंगभूमीमध्ये किती दबदबा होता, परंतु आपल्या पराभवापेक्षा काँग्रेस नेत्यांना भाजपची पिछेहाट अधिक महत्त्वाची वाटली. बिगर भाजप पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या पक्षांची केविलवाणी अवस्था विसरून ममता बॅनर्जी यांचे उत्साहात अभिनंदन केले. या निवडणुकीदरम्यानच महाराष्ट्रामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. त्यामध्ये भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगिरथ भालके यांचा निर्णायक पराभव केला. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचूक नियोजन करून विजय खेचून आणला. महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून फडणवीस यांनी आपले राजकीय चातुर्य दाखवले, तथापि या पराभवाबद्दल एकही शब्द न उच्चारता महाविकास आघाडी सरकारचे नेते ममता बॅनर्जी यांचे गुणगान गाण्यात मग्न होते. शिवसेनेचा तर ना बंगालच्या निवडणुकीशी संबंध, ना पंढरपूरच्या पोटनिवडणुकीशी. कुठेही त्यांचे उमेदवार किंवा कार्यकर्ते औषधापुरतेदेखील नव्हते, परंतु असे असूनही ममतादीदींच्या विजयामध्ये ते आपली पाठ थोपटून घेत आहेत. काँग्रेस पक्ष तर हळूहळू विलयाकडेच निघाला आहे. त्यांच्या हाताला या निवडणुकीमध्ये काही म्हणता काहीही लागले नाही, परंतु त्यातून ही मंडळी काही शिकतील अशी शक्यता नाही. बंगालच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले तरी एक चांगली सुरुवात झाली आहे. भाजपच्या तथाकथित पराभवाच्या निमित्ताने विरोधकांना आनंदसोहळा साजरा करायचा असेल, तर तो त्यांना लखलाभ!

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply