पनवेल : बातमीदर
मुंबई, पुणे, गोवा, जेएनपीटी अशा विविध दिशांना जाणारा पळस्पे फाटा वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना नकोसा झाला आहे. रस्त्यावर बेकायदा उभ्या राहणार्या वाहनांमुळे कळंबोली सर्कलपासून सुसाट वेगाने पनवेलबाहेर पडणार्या वाहनांना पळस्पे फाटा ओलांडण्यासाठी अर्धा तासाच्या वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागतो.
पनवेल शहरातून बाहेर पडल्यानंतर जुन्या महामार्गाने पुणे, लोणावळा, गोवा, अलिबागकडे जाण्यासाठी पळस्पे फाट्यावर जावेच लागते. कळंबोली सर्कलपासून पळस्पेपर्यंत शहरांमधून जाणारा मार्ग सुसाट झाला आहे. काळुंद्रे नदीवरील नव्याने बांधलेला उड्डाणपूल, गाढी नदीवर बांधलेल्या उड्डाणपुलामुळे पूर्वी अर्धा ते पाऊण तासाचा हा सात किलोमीटरचा रस्ता काही मिनिटांत ओलांडता येतो. पनवेल, खांदा कॉलनीत न येणार्या वाहनांना हा मार्ग अत्यंत सोयीचा झाला आहे. हा चकचकीत रस्ता संपला की वाहनचालकांना पळस्पे फाट्यावर ब्रेक मारावा लागत आहे. पळस्पे फाट्यावर असलेल्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गाड्या थांबविल्या जातात, मात्र रस्त्यावर बेकायदा उभ्या केलेल्या वाहनांमुळे इतर वाहनांना कोंडीचा सामना करावा लागतो आहे. प्रत्येक पावसाळ्यात येथे वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढते. शुक्रवारपासून रविवारी सायंकाळी येता-जाता प्रचंड कोंडी होऊन स्थानिक नागरिकांची वाहने, सार्वजनिक वाहने या कोंडीत अडकतात. पूर्वी मर्यादित हॉटेल असलेल्या पळस्पे फाट्यावर आता मोठ्या प्रमाणात लहान-मोठी हॉटेल उभी राहिली आहेत. लोणावळा, अलिबाग, मुरूड, जंजिराकडे जाणारे प्रवासी येथे आवर्जून थांबतात. वाहन पार्किंगची सोय नसल्यामुळे महामार्गाच्या शेजारीच गाड्या लावून प्रवासी नाश्ता करण्यासाठी येथे थांबतात. दिवसभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंडी होऊन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पनवेल शहर वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत असून कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस सुटीच्या दिवशीदेखील उपलब्ध नसतात. त्यामुळे कळंबोली सर्कलपासून पळस्पेपर्यंत महामार्गावरील सगळे अडथळे दूर झाले आहेत, मात्र पळस्पे फाट्यावर वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे ब्रेक लावावा लागतो आहे.
- पावसाळ्यात तासभर कोंडी
या मार्गावर ओएनजीसी कंपनीच्या आधी कोकण रेल्वेचा पूल जातो, पुलाखालून मुंबई-पुणे महामार्ग आहे. वरून पूल जात असल्याने उंची मर्यादित ठेवण्यासाठी मुंबई-पुणे महामार्ग सखल आहे. सखल भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे वाहनांची गती मंदावते. रस्ते विकास महामंडळाच्या कामचुकारपणामुळे येथेदेखील वाहनांना ब्रेक लागतो, या कोंडीतून मार्ग काढल्यानंतर पुन्हा पळस्पे येथे कोंडी होते. त्यामुळे स्थानिक प्रवाशांसाठी असलेले पाच मिनिटांचे अंतर एक तासाचे झाले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper