Breaking News

पवारांची घराणेशाही मतदार उलथवणार

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची टीका

कर्जत : बातमीदार

शरद पवार यांचा राजकीय वारस यापूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे पार्थ हे पवारांचे कितवे वारस आहेत? असा सवाल करून राष्ट्रवादीने मावळवर लादलेली घराणेशाही येथील सुज्ञ मतदार उलथवून टाकतील, अशी टीका रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 13) नेरळ येथे आयोजित कार्यकर्ता सभेत केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ नेरळ येथील बापूराव धारप सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी पालकमंत्री चव्हाण बोलत होते.

या सभेला पालकमंत्री चव्हाण यांच्यासह सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, आरपीआयचे कोकण प्रदेश संघटक मारुती गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी जगताप, संघटक राजेश जाधव, भाजप तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, चिटणीस रमेश मुंढे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावळाराम जाधव, पंचायत समितीच्या सदस्या सुजाता मनवे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, आरपीआय तालुका अध्यक्ष राहुल डाळिंबकर, भाजप प्रज्ञा प्रकोष्ठ संयोजक नितीन कांदळगावकर, भाजप तालुका चिटणीस प्रवीण पोलकम, आरपीआय महिला तालुका अध्यक्ष सुरेखा चिकने, शिवसेना उपतालुकाप्रमुख अंकुश दाभणे, सुमन लोंगले, नेरळच्या सरपंच जान्हवी साळुंखे आदींसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री चव्हाण आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, देशाची मान जगाच्या पाठीवर अभिमानाने उंचावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत एक रुपयाचे कर्ज घेतलेले नाही. जनसेवकाची भूमिका त्यांनी यशस्वीपणे बजावली आहे, मात्र मावळमध्ये आयात उमेदवार आपल्या नेत्यांचे राजकीय वारस ठरविण्यासाठी सर्वांना राष्ट्रवादी एकत्र करू पाहत आहे, पण शरद पवार यांचे राजकीय वारस यापूर्वीच जाहीर झाले असताना पार्थ नक्की कोणता वारसा सांगत आहेत? घराणेशाही काय असते हे राज्यातील जनतेने पार्थ यांच्या उमेदवारीने पवारांनी दाखवून दिले आहे. ही लादलेली घराणेशाही मतदार स्वीकारणार नाहीत आणि त्यांना कोणाचे राजकीय वारस म्हणून मान्यदेखील करणार नाही, असा दावा ना. चव्हाण यांनी केला.

देशाचे राजकारण काँग्रेस आघाडी दूषित करू पाहत आहे. भ्रष्टाचार करणारे पुन्हा सत्तेत शिरकाव करू पाहत असून, त्यांना जागीच ठेचले पाहिजे, असे सांगून आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ देश उभा करायचा आहे. त्यासाठी घराघरात जाऊन महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

सुरुवातीला शिवसेना नेरळ शहरप्रमुख रोहिदास मोरे, भाजप शहर अध्यक्ष अनिल जैन, आरपीआय शहर अध्यक्ष बाळा संदानशिव यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा सन्मान केला. सभेचे सूत्रसंचालन भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजेश भगत यांनी केले.

कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

भारतीय जनता पक्षात येणार्‍यांचा ओघ ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत वाढला आहे. विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. अशाचप्रकारे नेरळमध्ये झालेल्या सभेत साळोख येथील मुद्देशीर सैरे, सहेद सैरे, अफसास सैरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply