Breaking News

पहिला पाऊस

ऊन जरा जास्त आहे अस दरवर्षी वाटते. यावर्षी पाऊस चांगलाच लांबला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या प्रत्येकाच्या मनात पाऊस कधी एकदा पडतोय असे झाले होते. पाऊस येतो आपल्या मर्जीने, पाऊस जातो आपल्या मर्जीने, हवामान खात्याच्या नाही हेच खरे असल्याचे सांगत तो आला एकदाचा. पाऊस पडला आणि सगळ्यांनी निश्वास सोडला. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद सगळ्यांनीच घेतला. ‘पाऊस पडून गेल्यावर मन पागोळ्यांगत झाले, क्षितिजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले’ या मिलिंद इंगळे यांच्या गारवाची आठवण पहिल्या पावसाची वेगळी मजा अनुभवताना नक्कीच आली असणार.

पाऊस पडून गेल्यावर मन भिरभिरता पारवा, पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा, असा हा पहिला पाऊस. पहिला पाऊस म्हटले की त्या पावसासोबत येणारा वारा, आकाशात एकत्र येणारे ते काळे ढग, पक्ष्यांची घरट्यात जाण्यासाठी असणारी लगबग असे सगळे प्रसन्न वातावरण असते. पहिल्या पावसाचा पहिला थेंब जेव्हा उन्हाने तापलेल्या जमिनीवर पडतो तेव्हा येणारा मातीचा गंध तर काय सार्‍या उंची अत्तराची मिजास एका क्षणात उतरवतो. हातातील सगळी कामे टाकून त्या पावसात मनमुराद भिजायचे. पावसाचे ते टपोरे थेंब अंगाला टोचत असले तरी ते झेलून त्याचा आनंद घ्यायचा. पाऊस पडून गेल्यावर मातीचा सुगंध दरवळत असताना मित्रांबरोबर त्या पावसात नाचायचे. आपल्यातील प्रत्येकाला हा पहिला पाऊस कधी ना कधी अनुभवायला मिळतोच. पहिला पाऊस पडला की कोणी बाईक काढून मस्त भिजत लाँग ड्राईव्हला जातो, तर कोणी प्रेयसीसोबत समुद्रकिनारी जाऊन दगडांच्या आडोशाला हा पाऊस अनुभवतो. काही जण हा पाऊस फक्त घराच्या खिडकीतून अनुभवतात. पहिल्या पावसात सोबत चहा आणि गरमागरम कांदा भजी असली तर त्या पावसाची गंमत वेगळीच असते. एकंदर काय तर प्रत्येकाची पहिला पाऊस अनुभवण्याची वेगळी तर्‍हा असते.

पहिला पाऊस पडला की काय मस्त वाटायचे. अगदी लहान होतो तेव्हाचेही आठवते. घरापुढे मोकळी जागा होती. शिवाय सगळी घरे शेतजमिनीवर झाल्याने चिखलही भरपूर व्हायचा. आजूबाजूला सगळी शेती, त्यात पावसाचे साचणारे पाणी, त्या साचलेल्या डबक्यात धपक्न एक पाय देऊन किंवा उडी मारून मिळणारा आनंद शब्दांत व्यक्त कसा करता येईल? पावसाच्या साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या तयार करून न सोडलेला माणूस शोधूनही सापडणार नाही. तो तर पावसाच्या दिवसातला छंदच असतो. खूप पाऊस झाला की शेतात येणारी वळगण (मासे) पकडण्यासाठी हातात काठी घेऊन मासा दिसला की त्याच्यावर फटका मारायचा आणि त्याला पकडायचे. आम्ही मित्र त्या पाण्यात कितीतरी वेळा असे मासे पकडायला भटकायचो.

लहान असतानाचे दिवस म्हणजे दूरदर्शनचे दिवस. त्यावेळी प्रत्येक घराघरात टीव्ही नव्हता. गुरुवारचे छायागीत, शनिवार-रविवारचा सिनेमा आणि क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी ज्याच्या घरी टीव्ही आहे त्याच्याकडे आजूबाजूचे सगळे जमत असत. पाऊस पडून गेला की पावसामुळे म्हणा किंवा वार्‍यामुळे एन्टीना हलायचा आणि टीव्हीवर फक्त मुंग्या दिसायच्या. मग घराच्या गच्चीवर किंवा कौलावर चढून एक जण एन्टीना हलवायचे काम करायचा. एक जण खाली खिडकीपाशी असायचा. मग थोडे उजवीकडे, थोडे डावीकडे, असे ओरडत टीव्हीवरच्या मुंग्या कमी झाल्या की परत सगळे घरात. पावसाळ्यात हा प्रकार नेहमीचाच. या दिवसांत टीव्हीवर मुंग्या यायच्याच, पण सर्वत्र अन्य प्राण्यांची संख्याही वाढायची. या अन्य प्राण्यांत पहिला नंबर लागतो तो बेडकांचा. चिखल आणि भरपूर साचलेले पाणी असले की बेडूकही भरपूर व्हायचे. एरवी न दिसणारा हा प्राणी पाऊस पडला की लगेच एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या ताबडतोब कसा हजर होतो हे मला न सुटलेले कोडे आहे. तसेच दिवसभर न ओरडणारे बेडूक रात्र झाल्यावरच का डराव डराव करतात हे दुसरे कोडे. पावसात दिसणारा दुसरा प्राणी म्हणजे गोगलगाय. पाऊस पडून गेल्यावर आणि सगळीकडे हिरवेगार झाल्यावर दिसणार्‍या फुलपाखरांना विसरून कसे चालेल. लहानपणीचे कितीतरी दिवस या फुलपाखरांच्या मागे धावण्यात आणि पकडण्यात गेलेत. फुलपाखरांमागे धावता धावता दिवसही कसे भुर्रकन उडून गेले ते कळलेच नाही.

तारुण्यात प्रत्येकाच्या प्रेमात या रिमझिम पावसाची ओढ लावणारी मध्यस्थी असते. म्हणूनच या रिमझिम बरसणार्‍या पावसात आणि तिच्यात काहीतरी साम्य असल्याचे नेहमीच त्याच्या मनाला जाणवते. सुगंधाची दरवळ घेऊन बरसणार्‍या या पावसाच्या आगमनामुळेच ओसाड माळरानावरही प्रीतीची पालवी फुटते. अगदी तसेच ती आल्यावरही त्याच्या मनामध्ये या प्रीतीचा गंध दरवळू लागतो आणि पाहता पाहता वातावरणातला गुलमोहर कधी गुलाबी होऊन जातो हे त्यालाही कळत नाही. या रिमझिम पावसाच्या आणि तिच्या आठवणींनी तुमच्याही मनामध्ये घर केले असेलच ना.  रिमझिम पाऊस पाहिला की खुलतो ना तुमच्याही मनाचा पिसारा त्याच पावसाच्या व तिच्या आठवणींनी. या पावसाच्या साक्षीनेच प्रीतीचा गारवा दोघांच्याही मनामध्ये गंधित होत असतो. पावसामुळे दरवळणारा मातीचा गंध, पावसाचे ते टपोरे थेंब, मधूनच वार्‍याची येणारी ती झुळूक, चिंब भिजल्यानंतर एकमेकांना नयनात शोधणार्‍या त्या नजरा आणि तिच्या भिजलेल्या चेहर्‍यावरील आनंद पाहण्याचे मिळालेले ते भाग्य त्याला आणि तिला अगदी बेधुंद करून जाते. पावसाने तिची अडवलेली वाट त्याच्यासाठी एक प्रीतीची भेटच ठरून जाते. यामध्ये पाऊस आपली मैत्री निभावतो आणि आपण आपली प्रीत फुलवतो. प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा हा पाऊस यावर्षी उशिरा का होईना पण सुरुवातीलाच अगदी मनसोक्त बरसला आणि नालेसफाईचे बिंग फोडून गेला.

-नितीन देशमुख, फेरफटका

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply