आवश्यक निधीबाबत अहवाल बनविण्याचे काम सुरू

खोपोली ः प्रतिनिधी
मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा बसण्यास प्रारंभ होतो. वाढत्या उन्हाच्या झळांबरोबर दुर्गम व उंचावरील वाड्या, वस्त्या व काही गावांत दरवर्षी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. मागील वर्षी उन्हाळ्यात खालापुरात 18 गावे व 39 वाड्या, वस्त्यांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. यंदा उशिरापर्यंत पडलेला पावसाचा परिणाम व सोबत खालापूर पंचायत समितीच्या माध्यमातून तसेच स्थानिक ग्रामपंचायतीकडून पाणी समस्या सोडवण्यासाठी व याकामी उपाययोजना होण्यासाठी योग्य कामगिरी झाल्याने यावर्षी पाणीटंचाईचे चटके कमी बसणार आहेत. त्यामुळेच मार्चमध्ये तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत क्षेत्रात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली नाही, मात्र एप्रिल व मे महिन्यांत तालुक्यातील 10 ते 12 गावे व 28 ते 30 दुर्गम वाड्यावस्त्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता बघता पंचायत समितीकडून विविध उपाययोजना व त्यासाठी आवश्यक निधीबाबत अहवाल बनवण्याचे काम सुरू झाले आहे. विद्यमान स्थितीत तालुक्यात तीव्र पाणीटंचाई नसली तरी एप्रिलपासून पुढील दोन-अडीच महिने गोहे, होराळे, परखंदे, झाडांनी, चिलठन, गोरठण, कुंभिवली, धामणी, खरसुंडी, इसांबे, तळेगाव, आंबिवली, पाणसील, बीड खुर्द, हाल खुर्द, वावडंळ वाडी, कलोते रयती, वणी, शिवनगर, खाणे, तीनगरवाडी, वावर्ले वाडी, खैराट धनगरवाडी, भिलवलीवाडी, मोहपाडा आदिवासी वाडी, धामणी गावधनवाडी आदी गावे व वाड्यावस्त्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. एप्रिलपासून निर्माण होणार्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खालापुरातील 27 गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याचा व अन्य उपाययोजनांबाबतचा प्रस्ताव तयार केला जात आहे. दरम्यान, आठ गावे व 11 वाड्यावस्त्यांत नवीन विंधन विहीर निर्माण करणे, 19 गावे 26 वाड्यावस्त्यांत बोअरवेल करून पाणीपुरवठा उपलब्ध करणे आदी उपाययोजना असून, सात गावांच्या नळपाणी योजनांची कामे अंतिम असल्याने एप्रिलपर्यंत या योजना कार्यान्वित होण्यासाठी पंचायत समितीकडून प्रयत्न सुरू आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तालुक्यातील पाणीटंचाई कमी होणार आहे. मागील वर्षी पाणीटंचाई असलेल्या आठ गावे व 15 वाड्यावस्त्यांत पाणीपुरवठा व नळपाणी योजना पूर्णत्वास आल्या आहेत. त्यामुळे हा परिसर पाणीटंचाईमुक्त होईल. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पंचायत समिती प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायत स्तरावर प्रभावी उपाययोजना सुरू आहेत.
-संजय भोये, गटविकास अधिकारी, खालापूर
RamPrahar – The Panvel Daily Paper