कर्जत : बातमीदार
तालुक्यातील पाथरज गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरीच्या वरच्या भागातील तलावात म्हैस मृत झाली आहे. त्या म्हशीच्या शरिराचे अवयव कुजले असल्याने ग्रामस्थांना होणारा पाणीपुरवठा दूषित झाला आहे. कर्जत तालुक्यातील पाथरज गावात 80 ते 85 घरांची लोकवस्ती आहे. गावासाठी आठ वर्षापूर्वी जिल्हा परिषद सेस फंडातून विहीर बांधण्यात आली आहे. या विहिरीचे पाणी गावातील टाकीत साठवले जाते. तेथून ते संपुर्ण पाथरज गावाला पुरविले जाते. गावात दोन ते तीन दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. ग्रामस्थांनी विहिरीची पाहणी केली असता, ग्रामस्थांना विहिरींच्या वरच्या भागात असलेल्या तळ्यात म्हैस मरून पडलेली आढळली. ती मृत म्हैस सडून गेली होती. त्या तळ्यातील पाणी पाझरून विहिरीत येते. तेच पाणी पाथरज गावातील टाकीत साठवले जाते आणि ते सर्व पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. दुर्गंधीयुक्त पाणी पिल्याने काही ग्रामस्थ आजारीसुद्धा पडले आहेत. ग्रामस्थांनी साफ करून विहिरीमधील पाणी बाहेर काढून फेकले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper