नवी मुंबई : विमाका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागात मनरेगा योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 5 हजार 025 कामांना सुरुवात झाली असून उपस्थित मजूरांची संख्या 24 हजार 603 इतकी आहे. पालघर जिल्ह्यातील कामांना मजूरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.
कोकण विभागातील जिल्हयांतर्गत कृषि, वनपरिक्षेत्र, वनप्रकल्प विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम विकास अशा विविध विभागांमार्फत सुरु करण्यात आलेल्या कामांची संख्या व कामावर उपस्थित मजूरांची संख्या अशी ठाणे-322 कामे 1 हजार 069 मजूर, रायगड-198 कामे 653 मजूर, पालघर 2 हजार 141 कामे 16 हजार 055 मजूर, रत्नागिरी 1 हजार 511 कामे 4 हजार 481 मजूर, सिंधुदूर्ग 853 कामे 2 हजार 345 मजूर संख्या आहे. यात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक कामे सुरु असून इतर जिल्ह्यांपेक्षा मजूरांची उपस्थिती लक्षणीय आहे. इतर जिल्ह्यांनी देखील कामांची संख्या व मजूरांची उपस्थितीती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन दौंड यांनी या वेळी केले.
सोशल डिस्टंसिंगचे नियम तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अटीशर्तींच्या अधिन राहून कोकण विभागाअंतर्गत जिल्हयांमधील ग्रामपंचायत, कृषि, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांमार्फत विविध ठिकाणी बांधकामाच्या कामांना 22 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये रस्तेदुरुस्ती, नवीन रस्त्यांचे बांधकाम, नाले सफाई, नवीन नाल्यांचे बांधकाम, छोटया नद्यांवरील मोर्यांची दूरुस्ती व बांधकाम अशा कामांचा समावेश आहे. पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन या कामांची संख्या वाढविण्यात आली आहेत. मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम) या योजनेअंतर्गत विविध विभागांमार्फत उपलब्ध करुन दिलेल्या वाढत्या कामांमुळे लॉकडाऊनच्या काळात बिघडलेले मजूरांचे आर्थिक गणित सुरळीत होण्यास मोठी मदत होत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper