Breaking News

पाली-खोपोली रस्त्याची दुरवस्था

वाहनचालकांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

सुधागड ः प्रतिनिधी

अत्यंत महत्त्वाचा असलेला रस्ता म्हणजे खोपोली-पाली -वाकण रस्ता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गजवळ असून या मार्गावरून येणार्‍या वाहनांना मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय म्हणूनही हा रस्ता सोयीचा व जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्यावरून रहदारी मोठ्या प्रमाणावर होत आहे.

त्यातच पाली हे अष्टविनायकापैकी महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. साहजिकच धार्मिक, पर्यटन व अन्य कारणासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या कारणांमुळे रस्त्याचा राज्य महामार्गाचा दर्जा काढून राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. खोपोली-वाकण रस्त्याला राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळून तीन वर्षांहूनही अधिक काळ लोटला तरी रस्त्याचे काम पूर्णत्वास जात नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असतानाच वाहनचालकांना मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी खडी टाकल्याने दुचाकीस्वारांना तर फारच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक गाड्या मध्येच बंद पडत आहेत. टायर पंक्चर होण्याचेही प्रकार घडत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच एक-दोन दिवसांत रस्त्याची दयनीय अवस्था झाली, तर पुढे पूर्ण पावसाळा पार पडायचा आहे. खोपोली-वाकण रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार ठेकेदार की महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाचे अधिकारी, हा प्रश्न या रस्त्यावरून प्रवास करणार्‍यांना पडला आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply