अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील पाल्हे येथे खाडीकिनारी 20 हेक्टर क्षेत्रावर लावलेले मानवनिर्मित कांदळवन चांगले बहरत आहे. ओसाड जमिनीवर सागरी पर्यावरण बहरू लागले आहे. कांदळवनाच्या आधाराने स्थानिकांना चिंबोर्या, मासे पकडण्याचे साधन निर्माण झालेले आहे. झाडावर सुगरणीची घरटे दिसू लागले आहेत. यासह इतर पक्षांचीही किलबिलाट सुरू झाली आहे.
वाढते औद्योगिकीकरण, शेतीसाठी कांदळवनाची खूप मोठ्या प्रमाणात तोड झाल्याने सागरी पर्यावरणाला धोका वाढू लागला आहे. यावर उपाय म्हणून कांदळवनाची निर्मिती केली जात आहे. वनविभागाने पाल्हे येथे खाडीकिनारी 20 हेक्टर क्षेत्रावर कांदळवनाची निर्मिती केली आहे.
काही वर्षांपूर्वी खारे पाणी न येणार्या भागात गवत उवगलेले होते. आजूबाजूच्या गावातील गुरे या ठिकाणी चरायला सोडली जात होती. तर खाडी लगतचा भाग ओसाड होता. समुद्राला येणार्या उधाणाचे पाणी अडवण्यासाठी कोणताही अडथळा नव्हता. त्यामुळे या परिसरात खारे पाणी शिरण्याची शक्यता अधिक होती. वनविभागाने 2019 मध्ये तेथे कांदळवनाची 50 हजार रोपे लावली होती.
ती झाडे आता चांगली बहरली आहेत. अवेशिनीया मरीना, सिरॉफ्स टॅगल, अवेशिनीया ऑफिसिनॅलिस, एजिसिप्स कॉनकुलॅटम, ब्रुगेरिया सिलेनडिका या जातींचा त्यात समावेश आहे. त्यामुळे या ओसाड जमिनीवर आता सागरी पर्यावरण बहरू
लागले आहे.
कांदळवनाच्या आधाराने स्थानिकांना चिंबोर्या, मासे पकडण्याचे साधन निर्माण झालेले आहे. झाडावर सुगरणीची घरटे दिसू लागले आहेत. इतर पक्षांचीही किलबिलाट सुरू झाला आहे.
कांदळवन वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. ते आता प्रत्यक्षात दिसू लागले आहेत. या कांदळवनामुळेे परिसरात खारेपाणी शिरणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी कांदळवनाची नैसर्गिकपणे वाढ होण्यास मदत होणार आहे.
-आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक, अलिबाग
RamPrahar – The Panvel Daily Paper