पं.स.चा अहवाल गुलदस्त्यात
रोहे : प्रतिनिधी
तालुक्यातील भुवनेश्वरमधील काही भागात पावसाळ्यात पाणी भरत असल्याने तेथील नागरिकांना मोठा त्रास होतो. ही समस्या सोडविण्यासाठी तेथील नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासन यंत्रणा यांच्याकडे निवेदने दिली, मात्र आश्वासनाव्यतिरिक्त त्यांच्या समस्यांचे निराकरण झालेच नाही. त्यामुळे आपत्ती घडल्यानंतरच ही समस्या सोडविण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वरसे (ता. रोहा) ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वरमधील काही नागरी भागात गेल्या अनेक वर्षांपासून पावसाचे पाणी तुंबत असल्याने तेथील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याबाबत तेथील नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच रोहा प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे सातत्याने तक्रारी केल्या आहेत. भुवनेश्वर परिसरात पाणी तुंबण्याचे कारण शोधण्यासाठी तीन वर्षापुर्वी गटविकास अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने 14 मुद्दे घेत अहवाल सादर केला, मात्र तो बिल्डरांना मारक असल्याने गुलदस्त्यातच ठेवण्यात आला. दुसरीकडे गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाने अहवाल दिला होता, तोही गोपनीय ठेवण्यात आला आहे. खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी भुवनेश्वर भागात पहाणी करुन पाणी तुंबण्याच्या समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले होते. तर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी गेल्या वर्षी भर पावसात भुवनेश्वर येथे जाऊन पाहाणीही केली. त्यावेळी त्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी स्थानिक नागरिक, संबंधीत ग्रामपंचायत, बिल्डर व पत्रकार यांची बैठक घेऊन ही समस्या सोडविण्याचे आदेश महसूल विभागाला दिले होते. त्यानुसार गेल्या आठ महिन्यात रोहा पंचायत समिती, वरसे ग्रामपंचायत, बिल्डर, पाटबंधारे विभाग व पत्रकार यांच्या एकत्रीत तीन बैठका घेण्यात आल्या. यातील एक बैठक वरसे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये व दोन बैठका तहसील कार्यालयात घेण्यात आल्या. या बैठकीत फक्त प्राथमिक माहिती घेण्यात आली. पुढे या ना त्या कारणास्तव बैठका घेण्यात आल्या नाहीत. सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. मात्र पावसाळ्यात भुवनेश्वरमधील काही भागात पाणी तुंबत असल्याची समस्या ही पाहणी, अहवाल, आश्वासने, बैठाका यातच अडकून पडली आहे. या पावसाळ्यात भुवनेश्वर भागात काय खबरदारी घेणार, याची चर्चासुध्दा नाही.
RamPrahar – The Panvel Daily Paper