Breaking News

पुढील धोरणाची दिशा

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मदत होत आहे, तेव्हा लॉकडाऊन वाढवायला हवा, असे मत देशातील बहुतेक मुख्यमंत्र्यांनी नोंदवले असले तरी पहिल्या लॉकडाऊनसारखाच हा दुसरा लॉकडाऊनही असेल की या वेळी काही वेगळे धोरण अनुसरले जाईल हे मोदीजींच्या मंगळवारच्या संदेशानंतरच स्पष्ट होऊ शकेल.

भारतात कोरोना विषाणूचा फैलाव वाढू लागल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंबीरपणे निर्णय घेऊन 21 दिवसांचा म्हणजे 14 एप्रिलपर्यंतचा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला होता. मंगळवार हा या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असून, आता पुढे काय याविषयी मोदीजी आज मंगळवारी सकाळी 10 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाची राज्या-राज्यांमधील परिस्थिती समजून घेण्यासाठी 11 तारखेला पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. या वेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. ओडिशा, पंजाब यांसारख्या काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यापूर्वीच 30 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती, तर महाराष्ट्रात या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर लॉकडाऊन वाढवण्यात आला. महाराष्ट्रातील परिस्थिती सर्वांत चिंताजनक आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या नऊ हजारांच्या पुढे गेली असून यात बळी गेलेल्यांचा आकडा 300च्या पुढे गेला आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वांत जास्त कोरोनाबाधित असून राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी दोन हजारांवर गेली. यातील 1549 मुंबईतील आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या फैलावाला अटकाव करण्याच्या प्रयत्नांना अद्याप फारसे यश आले नसले तरी लॉकडाऊनमुळे देशाच्या अनेक भागांत कोरोनाच्या फैलावाचा वेग मंदावला आहे. काही गणितीतज्ज्ञांनी एका पाहणीतून तसे मत नोंदवले आहे. लॉकडाऊनची घोषणा करताना मोदीजींनी ‘जान है तो जहान है’ असे म्हटले होते. त्यामुळेच देशातील बहुसंख्य लोकांनी घरातच थांबून लॉकडाऊनला सहकार्य करण्याची आपली जबाबदारी पार पाडली होती, परंतु आता जान आणि जहान या दोन्ही बाबींकडे लक्ष द्यायला हवे आहे. अर्थात ‘जान भी और जहान भी…,’  असे उद्गार मोदीजींनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना काढले. लोकांचे जीव वाचवतानाच त्यांचे कल्याण साधण्याचा विचारही करावा लागणार आहे. त्यामुळेच आता लॉकडाऊन वाढवतानाच काही मोजक्या व्यापार-उद्योग क्षेत्रांना साह्य करण्यासाठी त्यांच्यावरील बंधने काहिशी शिथिल केली जाण्याची शक्यता आहे. सोबतच ज्या भागांमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला नाही अशा भागांमध्येदेखील जनतेला काहिशी मोकळीक दिली जाऊ शकेल. लॉकडाऊनचा मोठा फटका समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांना बसला आहे. रोज कमवायचे, रोज खायचे अशी जीवनशैली असणारे हे लोक रोजगार नसल्याने हवालदिल झाले आहेत. त्यांचा विचार करूनही सरकार काही पावले उचलण्याची शक्यता आहे. सरकारने शेती व मत्स्यशेतीला यापूर्वीच लॉकडाऊनमधून मोकळीक दिली आहे. अन्नधान्य, भाजीपाला आदींचा पुरवठा विनाअडथळा सुरू राहण्यासाठी ते आवश्यकही आहे. मुंबई-पुण्यासारख्या अनेक मोठ्या शहरी भागांतही लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळणे काहिसे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळेच ठिकठिकाणी भाजीपाला, किराणा सामान घेण्यासाठी गर्दी होताना दिसते. गरीब जनता तर एकाच वेळी बरीच खरेदीही करू शकत नसल्यामुळे त्यांचे अधिकच हाल होतात. या सार्‍या परिस्थितीला योग्य दिशा देण्यासाठी मोदीजी काय धोरण जाहीर करतात याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply