गेल्या आठवडाभरात राज्यात मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली असून त्यामुळे महाविकास आघाडी सरकार खडबडून जागे झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्येदेखील कोविड-19च्या केसेसमध्ये मोठी वाढ नोंदली गेल्याने केंद्र सरकारने या चारही राज्यांना कोरोना चाचण्यांच्या बाबतीत अतिशय दक्ष राहण्याची तसेच कोरोना साथीच्या फैलावाकडे बारकाईने लक्ष देण्याची सूचना केली आहे.
महाराष्ट्रात 16 एप्रिल रोजी उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या 626 इतकी होती, परंतु गेल्या अवघ्या दीड महिन्यात त्यात सात पट वाढ झाली असून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या आता साडेचार हजारावर गेली आहे. ही वाढ निश्चितच कुणालाही काळजीत टाकेल अशीच असून खरे तर यापूर्वीच राज्य सरकारला कोरोना पुन्हा डोके वर काढतो आहे हे ध्यानात यायला हवे होते. गेले सलग दोन दिवस राज्यात एक हजाराच्या वर रुग्णसंख्या नोंदली गेली. गुरुवारी राज्यात 1,045 रुग्ण आढळले तर मुंबईतील एका कोविड रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.07 टक्के इतके असले तरी कोरोना रुग्णसंख्येचा हा वाढत चाललेला आलेख चिंताजनक आहे. राज्य सरकारने मास्कसक्ती मागे घेतल्यापासून जनसामान्यांमधील कोरोनाची भीती पूर्णपणे निघून गेली आहे. कोरोना अद्याप आपल्या अवतीभवती आहे, याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी पुनरुच्चारदेखील केला होता. राज्य सरकारने मात्र राज्यात रुग्णसंख्या वाढत असूनदेखील त्याकडे डोळेझाक करण्याचेच धोरण अनुसरले. लोकांची मास्क वापराची सवय सुटली तसेच लसीकरणाची मोहिमही पुरती थंडावली. मुंबईत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या आठवर जाऊन पोहोचलेला दिसतो आहे. एवढे झाल्यावर कुठे राज्यातील आघाडी सरकारला जाग आली असून आणखी 15 दिवस परिस्थितीकडे लक्ष ठेवून सरकार निर्णय घेणार असल्याचे सांगितले गेले आहे. ओमायक्रॉनचे नवनवे उपप्रकार सापडत असताना मुळात महाराष्ट्राने मास्कसक्ती दूर करण्याची गरजच काय होती असा सवाल आता तज्ज्ञ करीत आहेत. यापूर्वी काही गणितीय अहवालांतही जूनमध्ये आपल्याकडे कोविडची साथ येण्याचा इशारा देण्यात आला होता, परंतु राज्य सरकारला या इशार्याांकडे लक्ष देण्याची गरज भासली नाही. राज्यात लसीकरण मोहिमही कमालीची थंडावली असून राज्यातील तब्बल 1.7 कोटी लोकांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही. राज्यात सर्वांना दुसरा व तिसरा प्रतिबंधात्मक डोस मिळण्यास या वेगाने कमालीचा वेळ लागू शकेल. लसीकरणाचा संपूर्ण प्रभाव व्हावयाचा असेल तर लसीकरण विहित वेळेतच पूर्ण होणे आवश्यक असते. लसीकरणाचा मंदावलेला वेग लसीकरणाच्या मूळ हेतूशीच सुसंगत नाही हे आघाडी सरकारला कुणीतरी सांगण्याची गरज आहे. ही अवघी चालढकल विशिष्ट हेतूने तर नाही ना अशी शंका येते, कारण गेल्या वर्षी लसीकरण हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा असताना मात्र शासकीय यंत्रणेचे प्रतिनिधी घरोघरी जाऊन लोकांना लस टोचून घेण्यास विनवत होते. आता तर सर्वसामान्यांना लसीची गरजच वाटेनाशी झाली आहे. तेव्हा पुन्हा एकदा लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्नशील होण्याची नितांत गरज आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper