एकीकडे वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर उन्हाळ्यात कोरोना प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त करतात, तर आरोग्यमंत्री कोरोनाची साथ वाढण्याचा वातावरणाशी संबंध नाही असे सांगतात. ही उलटसुलट विधाने आणि लॉकडाऊनचे इशारे यांनी लोक धास्तावून गेले आहेत. जनतेला शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यापलीकडे राज्यातील आघाडी सरकार महामारी नियंत्रणासाठी काही पाऊल उचलणार आहे का? की पुन्हा एकदा याबाबतीतही केंद्र सरकारकडेच बोट दाखवणार आहे?
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. नागपूर, अकोला, अमरावती येथील परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. तिथे रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. नाशिकमध्ये रुग्णसंख्या वाढू लागल्याने शनिवार-रविवार लॉकडाऊनची घोषणा करणे भाग पडले. जळगावमध्येही पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईसोबतच ठाणे शहरातही रुग्णसंख्या वाढते आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत ठाण्यातील दैनंदिन रुग्णसंख्या मार्चमध्ये दुपटीपेक्षा अधिक दिसू लागल्याने तेथील स्थानिक प्रशासनाने 16 परिसरांमध्ये लॉकडाऊनसदृश निर्बंधांची घोषणा केली आहे. मुंबईत तर दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या पुढे गेली आहे. राज्यातील कोरोना आघाडीवरील एकंदर चित्र हे असे असताना प्रशासकीय पातळीवर मात्र पुन्हा गोंधळच दिसतोय. अनेक जिल्ह्यांत स्थानिक प्रशासनांनी निर्बंध लागू केले आहेत. मुंबईत एकीकडे पालिका प्रशासनाकडून जनतेला लॉकडाऊनचा इशारा दिला जातो आहे, तर दुसरीकडे चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णसंख्या वाढल्याचेही सांगितले जाते आहे. मुंबईत चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचा दर पाच टक्क्यांनी घटलेला असल्याने चिंतेचे कारण नाही असेही प्रशासनाकडूनच सांगितले जाते. शहरातील बहुसंख्य रुग्ण हे इमारतींमधील आहेत. चाळ वा झोपडपट्ट्यांतील नाहीत असे आकडेवारी दर्शवते. चाळ वा झोपडपट्ट्यांमध्ये पुरेशा चाचण्या होत आहेत का, याचा खुलासा मात्र होत नाही. शहरातील गोरगरीब जनता आता कुठे पुरेशी रोजीरोटी हातात पडू लागल्याने कोरोनाला मागे टाकण्याच्या मन:स्थितीत आहे. आतापर्यंत राज्यात बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये लग्नसराईचा मौसम बिनबोभाट पार पडत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी त्यापाठोपाठच साथीचा फैलाव वेगाने झाला असावा. तो झाल्यानंतर उशिरा त्याची दखल घेतली जाते आहे. नाशिकमध्ये आता 15 तारखेपर्यंतच्या पूर्वनियोजित विवाहसमारंभांनाच परवानगी देण्यात आली असून त्यापुढे मंगल कार्यालये, लॉन्स आदी ठिकाणी विवाहसमारंभांना परवानगी दिली जाणार नाहीये. या संदर्भात राज्यभरातच वेळीच खबरदारी घेण्याची आवश्यकता नव्हती का? अनेक जिल्ह्यांत शाळा-कॉलेज पुन्हा बंद करण्याची वेळ ओढवली आहे. विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग पसरल्याचेही समोर आले आहे. सध्याच्या परिस्थितीत दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा कशा घ्यायच्या याबाबत शाळांना कोणत्याही सूचना गेलेल्या नाहीत. असे असताना राज्याचा शिक्षण विभाग बोर्डाच्या परीक्षांसंदर्भातील आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकांवरच हटून बसलेला आहे. बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन घेतल्या जाऊ नयेत अशी मागणी शिक्षक, मुख्याध्यापकांच्या संघटनांकडून केली जाते आहे. विद्यार्थी-पालकही अनेक सर्वेक्षणांतून हीच भावना व्यक्त करीत आहेत, परंतु तरीही त्यांची अस्वस्थता दूर करण्याच्या दिशेने राज्य सरकारकडून कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. एकंदर गोंधळयुक्त कारभारच मागील पानावरून पुढे सुरू आहे. या सार्याची परिणती महाराष्ट्रावर पुन्हा मागील ऑगस्ट-सप्टेंबरसारखी परिस्थिती ओढवण्यात होऊ नये.
RamPrahar – The Panvel Daily Paper