मालमत्तेचे नुकसान, जीवितहानी नाही

खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यामधील साजगांव-आडोशी औद्योगिक क्षेत्रातील पुष्पम फोरजींग कंपनीत शनिवारी (दि. 3) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्या परिसरात सर्वत्र ऑइल मिश्रीत ड्रम व डबे होते. त्यामुळे ही आग अधिक भडकली. या बाबत कंपनीकडून खोपोली अग्निशमन दल, पोलीस व आपत्कालीन यंत्रणांना माहिती देण्यात आली. या यंत्रणांनी तातडीने मदतकार्य केल्याने ही आग तासाभरात आटोक्यात आली. या दरम्यान कंपनीच्या एका विभागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शनिवारी रात्री साडेअकरा वाजता आग पूर्णपणे नियंत्रणात आल्याची माहिती कंपनीच्या अधिकार्यांनी दिली. दरम्यान, खोपोली अग्निशमन दल व पोलिसांनी एकत्रितपणे संपूर्ण कंपनी व परिसराची पहाणी केली व कोणताही धोका नसल्याने आग विझविण्याची मोहीम थांबविली. खोपोली पोलीस व अग्निशमन दलाने माहिती मिळताच जलतगतीने आपत्कालीन यंत्रणा राबवून ही आग आटोक्यात आल्याने पुढील मोठी हानी टळल्याचे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले.

RamPrahar – The Panvel Daily Paper