पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील कणे गावाला पुराचा फटका बसला असून, घरात पाणी शिरून अनेकांचे नुकसान झाले. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 14) कणे गावातील पूरग्रस्तांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांसह भाजप सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी राहील, अशी हमी देत ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ना. चव्हाण यांनी या वेळी दिले.
पालकमंत्र्यांनी सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत कणे गावात पुरामुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला.
या पाहणी दौर्यात माजी मंत्री रविशेठ पाटील, भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी सहभागी झाले होते.
पुरामुळे फुटलेल्या कणे खाडी खारभूमी बंधारा व इतर बंधार्यांच्या मजबुतीकरणासाठी सुमारे 600 कोटी रुपयांच्या मदत निधीचा प्रस्ताव एशियन बँकेकडून उपलब्ध करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत सुरू आहेत. यासाठी खारभूमी विभागाने तातडीने प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री चव्हाण यांनी दिले.
या वेळी ग्रामस्थांनी दिलेले मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांनी स्वीकारून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर पालकमंत्र्यांनी बोर्झे, वढाव, शिर्की-मसद, अंतोरे या पूरबाधित गावांची पाहणी केली, तसेच वाशी व वडखळ विभागातील गावांना भेटी दिल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper