नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
विजय हजारे चषक स्पर्धेमध्ये पृथ्वी शॉने सलग दुसरे शतक ठोकले आहे. कर्नाटकविरोधातील उपांत्य फेरीच्या सामम्यात पृथ्वीने तुफान फटकेबाजी करीत 79 चेंडूंत शतक झळकावले. यासोबतच एका सिझनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मयांक अग्रवलाचा विक्रमःी त्याने मोडला आहे. कर्नाटकविरोधात गुरुवारी (दि. 11) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पृथ्वी शॉने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 122 चेंडूंमध्ये 165 धावांची खेळी केली. यामध्ये 17 चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत पृथ्वी हा मुंबई संघाचे नेतृत्वदेखील करीत आहे. त्याने आतापर्यंत लौकिकाला साजेशी खेळी केल्याचे दिसून आले. मयांक अग्रवालने विजय हजारे चषक 2017-18च्या स्पर्धेत 723 धावा केल्या होत्या. मयांकचा हा विक्रम तोडताना पृथ्वी शॉने आतापर्यंत चार शतकांसह 754 धावा केल्या आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper