पेण ः प्रतिनिधी
मागील सहा महिन्यांपासून जगभरात कोरोनामुळे लाखो लोक मृत्यू पावले आहेत. त्यातच पेण तालुक्यात पहिले दोन महिने एकही पॉझिटिव्ह व्यक्ती आढळला नव्हता, परंतु तिसर्या लॉकडाऊनपासून पेणमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यूची श्रृंखला सुरू झाली. आता तर पेण तालुक्यात दररोज एखाद-दुसर्या मृत्यूची नोंद होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बुधवारी चार मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा गडब गावात एका मृत्यूची नोंद झाली. त्यामध्ये 27 वर्षीय महिलेचा समावेश आहे. शनिवारी गडब गावात आणखी एका 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच दिवशी पूर्व विभागातील वाकरूळ येथील 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, रविवारी पेण शहरात एका 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. आजमितीस पेण तालुक्यात 42 जणांनी कोरोनाच्या साथीत प्राण गमावले आहेत.या सर्व घटनांमुळे सणासुदीचे दिवस पाहता पेण शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून डॉक्टरसुद्धा शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णांना आपल्या दवाखान्यात घेत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये भीती निर्माण झाली असून रुग्णांना इतरत्र नेण्यासाठी त्यांची धावपळ होत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper