Breaking News

पेण बाजारपेठ राख्यांनी सजली; वेळेत वाढ झाल्याने दुकानदार आनंदित

पेण : प्रतिनिधी

रक्षाबंधन हा बहीण-भावाचे नाते वृद्धिंगत करणारा पवित्र सण येत्या रविवारी (दि. 22) म्हणजे काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासाठी पेणच्या बाजारपेठेत विविध प्रकारच्या रंगेबेरंगी निरनिराळ्या आकाराच्या झगमगणार्‍या राख्या आल्या असून, पेणच्या बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत. या राख्यांच्या खरेदीसाठी महिला, तरुणी गर्दी करत असून डायमंड लाईट राख्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. पूर्वीच्या स्पंज आणि चकाकी लावलेल्या राख्यांची जागा आता रंगीबेरंगी दोर्‍यांनी घेतली आहे. त्यातच बहीण आपल्या भाऊरायासाठी फॅशनेबल राखी शोधताना दिसत आहेत. सध्या बाजारात 10 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत किंमत असलेल्या राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. बच्चेकंपनीला खुणावणारे विविध कार्टून, छोटा भीम, डोरेमॉन, स्पायडर मॅन अशा विविध कार्टुन्सनी सजलेल्या राख्यांचाही त्यात समावेश आहे. बालगणेश, कृष्णा हेदेखील राखीच्या सजावटीतून बालगोपाळच्या भेटीला आले आहेत. बच्चेकंपनीला या राख्यांनी भुरळ पाडली आहे. कोरोनाची तीव्रता कमी होत असल्याने दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत वाढ झाल्यामुळे दुकानदारांनीही आपल्या दुकानात मोठ्या प्रमाणात माल भरून ठेवला आहे. यामुळे राख्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिक वेळ मिळणार आहे व विक्रीही चांगली होणार आहे. राख्यासोबत गिफ्ट हँपर्स आणि स्पेशल फेस्टिवल कलेक्शन बाजारपेठांमध्ये दिसून येतात तसेच रक्षाबंधनानिमित्त गिफ्टच्या दुकानात विविध प्रकारची ग्रीटिंगकार्ड आली आहेत. अनेक कंपन्या सणाची संधी साधून खप वाढविण्यासाठी बाजारात उतल्या आहेत, तसेच चॉकलेटची विविध गिफ्ट पॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. कामानिमित्त आपल्यापासून दूर असलेल्या भावाला पोस्टाने राख्या पाठविण्यासाठी सध्या राख्यांची खरेदी होत आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply