महाड : प्रतिनिधी
मुंबई येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग महापौर चषक स्पर्धेत महाड तालुक्यातील नांदगाव बु. येथील प्रशांत जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 60 किलो वजनी गटात त्याने हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे प्रशांत जाधव हा दिव्यांग असूनदेखील हे यश मिळवले आहे. सुवर्ण आणि रौप्य अशी दोन पदके प्रशांतने पटकावली आहेत.मुंबई सांताक्रूझ येथे पॅराऑलिम्पिक पॉवर लिफ्टिंग असोसिएशन मुंबई यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाड तालुक्यातील नांदगाव बु. येथील प्रशांत जाधव या दिव्यांग तरुणाने 60 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर याच ठिकाणी आमंत्रित पॅराऑलम्पिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. प्रशांत जाधव याने दोन पदके प्राप्त केल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वडील आणि भावांच्या सहकार्याने हे यश प्राप्त करणे शक्य झाल्याच्या भावना प्रशांत याने व्यक्त केल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper