पनवेल : बातमीदार
पनवेल रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पोदीवर जाण्यासाठी फाटकामधून जाणे, अजून तरी टळण्याची चिन्हे नाहीत. त्यासाठी अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे. महावितरणची वीजवाहिनी काढण्यास विलंब झाल्यामुळे हे काम रखडले आहे. नवीन पनवेल सेक्टर 15, 15 ए, 16, तसेच पोदी आणि विचुंबे गाव या भागात पनवेलकडून वाहने घेऊन जाण्यासाठी सध्या पनवेल रेल्वेस्थानकाजवळ उजव्या बाजूला असलेल्या फाटकाजवळ वाट पाहत उभे राहावे लागते. पनवेल रेल्वेस्थानकातील भविष्याची व्याप्ती पाहता फाटक बंद करून पुढच्या बाजूला भुयारी मार्ग बनविण्यात आला आहे. या फाटकामुळे नागरिकांचा वेळ आणि मोठा वळसा वाचून इंधन आणि वेळेची बचत होणार आहे. नवीन पनवेलचा उड्डाणपूल आणि शंभर मीटरच्या अंतरासाठी काही मिनिटे घेणारे फाटक याशिवाय येथील नागरिकांना दुसरा पर्याय नाही. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गरज ओळखून 2017मध्ये भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला रेल्वे मार्गावरील आलेले वीजवाहक तारेचे अडथळे रेल्वे प्रशासनाने दूर केले. मे 2018मध्ये भुयारी मार्गाचे काम पूर्ण होऊन तो रहदारीस खुला होणे अपेक्षित होते, मात्र डिसेंबर 2017पासून काम बंद पडले. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे भुयारी मार्गात रेडिमेड सिमेंट ब्लॉक पावसाळ्यापूर्वी टाकण्यात आले, मात्र पोदी बाजूकडे असलेल्या महावितरणच्या वीजवाहक खांबाचा अडथळा दूर न झाल्यामुळे पावसाळा संपूनही भुयारी मार्ग वाहतुकीस खुला झालेला नाही. भविष्यात कर्जत-पनवेल मार्गावर एक मार्गिका वाढू शकते म्हणून भुयारी मार्ग अधिक रुंदही करण्यात आला, मात्र महावितरणने खांब स्थलांतरित करण्यास निविदा प्रसिद्ध करूनही प्रतिसाद आला नाही. दोनदा एकाच कंत्राटदाराची निविदा आल्यामुळे आता तिसर्यांदा कंत्राटदाराची निवड केली जाणार आहे. हे काम पूर्ण झाले तरी पुढील पोदी आणि नवीन पनवेलमधील रस्ता पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागणार आहे. सिडकोकडून हा रस्ता बनविण्यात येणार असल्यामुळे आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्षात भुयारी मार्ग सुरू होण्यासाठी आणखी बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नगरसेवक, प्रवासी संघटनांनी भुयारी मार्गाची पाहणी केली. या वेळी रेल्वे प्रशासन, सिडकोला काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
महावितरणचे दोन खांब मधे आल्यामुळे कंत्राटदाराला काम बंद करावे लागले. खांब स्थलांतरित करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या, मात्र प्रतिसाद न मिळाल्यामुळे काम करता आले नाही. आता हे काम डिसेंबरपासून सुरू होण्याची आशा वाटते आहे.-तेजस कांडपिळे, नगरसेवक
RamPrahar – The Panvel Daily Paper