Breaking News

पोलादपुरात श्रीसदस्यांची स्वच्छता मोहीम

पोलादपूर : प्रतिनिधी

स्व. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी दिनानिमित्त श्रीसदस्यांनी संपूर्ण पोलादपूर शहरात स्वच्छता मोहीम राबविली. हे काम स्तुत्यच आहे, असे  मत पोलादपूरच्या तहसीलदार दिप्ती देसाई यांनी मंगळवारी व्यक्त केले.

पोलादपूर तालुक्यातील श्रीसदस्यांनी मंगळवारी सकाळपासून सुरू केलेल्या शहर स्वच्छता मोहिमेचा समारोप तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाला. त्यावेळी तहसीलदार देसाई बोलत होत्या. श्रीसदस्य यशवंत कासार यांनी, प्रास्ताविकामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीसदस्यांनी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या कामांचा आढावा घेतला.

पोलादपूर तालुक्यात वनराई बंधारे, विहिर गाळ उपसा आणि बोअरवेल जलपुनर्भरणाचे तसेच स्वच्छता अभियानाचे काम श्रमदानाने करून श्रीसदस्यांनी जागतिक स्तरावर लक्ष्यवेधी कार्य केले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी काढले. उपनगराध्यक्ष नागेश पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष सोनल गायकवाड, माजी नगराध्यक्षा अश्विनी गांधी, प्रकाश गायकवाड, नगरसेवक प्रसाद इंगवले व अस्मिता पवार, नगरपंचायतीचे अधीक्षक महादेव सरंबळे यांच्यासह अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.

मंगळवारी सकाळी पोलादपूर एसटी स्टँडपासून स्वच्छता मोहीम सुरू केल्यानंतर श्रीसदस्यांनी पंचायत समिती कार्यालय, श्रीकाळभैरवनाथ मंदिर, रयत शिक्षण संस्थेचे विद्यामंदिर, ग्रामीण रूग्णालय, डॉ. आंबेडनगर, बाजारपेठ, कृषी विभाग कार्यालय, पोलीस ठाणे, नगरपंचायत, कोषागार व तहसील कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता केली. संपूर्ण स्वच्छता अभियानाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे समीर गांधी यांनी केले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply