पोलादपूर ः प्रतिनिधी
तालुक्यातील कोतवाल खुर्द रेववाडी रस्त्यावर शनिवारी झालेल्या धरणी दुभंगाच्या घटनेनंतर सोमवारी सकाळी संपूर्ण रस्ताच दरीकडे झेपावत नदीच्या पाण्यापर्यंत वाहून गेला. त्यामुळे कोतवाल खुर्द रेववाडी, सकपाळवाडी आणि धनगरवाडीतील जनतेचा संपर्क तुटला आहे.
या घटनेनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासह, महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून पाहणी करण्यात येऊन सतर्कतेचा उपाय म्हणून संभाव्य भूस्खलन क्षेत्रातील घरांमधील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी जाण्याची व्यवस्था तहसील कार्यालयाने केली आहे.
कामथ-येरल रस्त्याला तडा
रोहे : तालुक्यातील येरल ग्रामपंचायत हद्दीत कामथ येरल रस्ताला तडा गेला आहे. आजूबाजूलादेखील मोठे तडे गेल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास हा तडा गेला असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.
रस्त्याला तडा गेल्याची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक तायडे, तलाठी सचिन काटे यांनी पाहणी केली. या वेळी आनंद सानप, विश्वास मेने, सोनाराम सानप, शांताराम सुतार, अशोक सानप, ग्रामपंचायत सदस्य अरविंद निलेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper