Breaking News

पोलादपूर तालुक्यात ‘केमिकल लोचा’

पोलादपूर तालुक्यामध्ये पंचतारांकित औद्योगिक वसाहत होण्यासंदर्भात तत्कालीन उद्योग राज्यमंत्री प्रभाकर मोरे यांनी केलेले प्रयत्न सप्ततारांकित शेतकरी संघर्ष समितीने हाणून पाडले होते. यानंतर ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत महाड औद्योगिक वसाहतीच्या तिसर्‍या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आली, मात्र अद्याप त्याचा विधीवत समारंभपूर्वक फलक लागूनही शुभारंभ काही झाला नाही.

पोलादपूर तालुक्यातील 25 वर्षांपूर्वीच्या या घटनाक्रमानंतर तालुका रोजगारमुक्त राहिलाच, पण तरीही प्रदुषणमुक्त राहील याचा विशेष आनंद होत होता. गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये तालुक्यात नदीमध्ये, कशेडी घाटातील डोंगर-दर्‍यामध्ये रासायनिक टँकर ओतण्याच्या तीन घटनांनंतर तालुका विनाकारण रासायनिक प्रदूषणाच्या गर्तेत अडकतो की काय अशी शंका निर्माण झाली आहे. तेव्हा उद्योग राज्यमंत्री प्रभाकर मोरे होते, तर आता उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे आहेत. तरीही प्रकार सुरूच आहेत. तालुक्यातील जनता गेली अनेक वर्षे फसवली गेली आहे. आता जनतेला रोजगार निर्मितीचा विसर पडला तरी भूमीवर आणि नदीमध्ये होणार्‍या रासायनिक प्रदूषणाची आठवण कायम ठेवण्याची गरज आहे. रासायनिक टँकर नदीपात्रात, तसेच कशेडी घाटातील दरीमध्ये रिकामा करण्याच्या घटनांचे पडसाद आता विधिमंडळ अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांच्यामार्फत तारांकित प्रश्न उपस्थित होऊन उमटणार आहेत. यासंदर्भात रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी केमिकल माफियांची चौकशी करण्यासोबतच 3 फेब्रुवारी रोजी पकडलेले दोन केमिकल टँकर पोलादपूर पोलिसांनी एका केमिकल माफीयाच्यालगतच्या ढाब्याजवळ कसे उभे केले याची चौकशी करण्याची ग्वाही दिली होती. यानंतर बातमी प्रसिध्द झाल्यावर लगेचच दोन्ही टँकर पोलादपूर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये सकाळी उभे करण्यात आले होते, मात्र या गुन्ह्याच्या दाखल रजिस्टरमध्ये हे दोन्ही टँकर ढाब्याजवळ उभे करण्यात आल्याचा उल्लेख असल्याने पोलिसांचा याप्रकरणी सहभाग किती, याबाबतही उहापोह होण्याची गरज आहे.

पोलादपूर पोलिसांनी रासायनिक टँकर ओतण्याच्या पहिल्या दोन घटनांमध्ये प्रचंड हलगर्जीपणा आणि अज्ञातास दाखविलेल्या अनुकूलतेनेबाबत साशंकता निर्माण व्हावी इतपत चिंताजनक परिस्थिती दिसून आली. तिसर्‍या घटनेमध्ये हेच पोलादपूर पोलीस अतिशय कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यतत्पर असावेत असाही भास निर्माण केला गेला. त्यामुळे या तीनही घटनांचा अभ्यास करणे या लेखामध्ये क्रमप्राप्त होत आहे.

28 डिसेंबर 2019 रोजी पोलादपूर तालुक्यातील पार्लेवाडी येथील चौपदरीकरणाच्या रस्त्यालगतच्या जमिनीवर, तसेच सावित्री नदीपात्रात एका विषारी केमिकलवाहू टँकरमधून केमिकल सोडण्यात आल्याने नदीकिनारी असंख्य मासे मरून तरंगू लागले. नदीकिनार्‍यालगतच्या नळपाणी योजनांच्या जॅकवेलमध्येही हे प्रदुषित पाणी शिरल्याने नळाव्दारे पाणीपुरवठा बंद ठेवून अन्य पाणवठ्यांचे जलशुध्दीकरण करून आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचा तात्पुरता पर्याय तयार केला. दरम्यान, नदीच्या पाण्याचे नमूने घेऊन पाण्याचे पृथ्थकरण करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांनी जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठविले. मेजर केमिकल झोन असलेल्या कोकणातील महाड औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक केमिकल इंडस्ट्रीज असून या कारखान्यांमधून उत्सर्जित होणारे रासायनिक घनकचरा आणि द्रवरूप केमिकल वेस्ट यांचे न्यूट्रलायझेशन करण्याची प्रक्रिया खर्चिक आहे.  काही ठिकाणी टँकर्सचे अपघात दाखवून टँकर पलटी करून आतील द्रवरूप केमिकल ओतून त्यानंतर टँकर पुन्हा उभा करून अपघात विमा दावा करून दुहेरी लाभाच्या मात्र जैवविधतेस हानीकारक योजना यशस्वी केल्या जातात, अशी माहिती मिळाल्याने पोलादपूर तालुक्यातील पार्ले येथे टँकरमधून कोणते विषारी केमिकल नदीत सोडले जाते याचा पृथ्थकरण अहवाल प्राप्त झाल्यानंतर टँकरचालक, तसेच केमिकल कंपनीचाही शोध घेणे पोलीस यंत्रणेला शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रदूषित पाण्याच्या पथ्थकरण अहवालामध्ये नमूद केमिकल वेस्ट कोणत्या कारखान्यातून सोडले जाते, याबाबत माहिती घेण्यासाठी प्रदूषित पाण्याचा पृथ्थकरण अहवाल मिळण्याची प्रतिक्षा पोलादपूर पोलीसांकडून केली जात असून, यानंतरच पोलादपूर गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी यांनी दिलेल्या तक्रारीअर्जानुसार अज्ञात टँकरचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी यांना सांगण्यात आले. याबाबत पोलादपूर पोलीस, आरोग्य विभाग, पंचायत समिती आणि तहसिल कार्यालय अशा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करूनही अद्याप अज्ञात टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला नाही.

22 जानेवारी 2020 रोजी कशेडी घाटातील पार्टेवाडी येथील प्रतापगड दर्शन फलकाजवळ दरीच्या बाजूला एका अज्ञात केमिकल टँकरमधील केमिकल ओतल्याचा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. हे केमिकल वाहात जाऊन खालील बाजूस असलेल्या एका विहिरीपर्यंत पोहोचल्याची माहिती भोगाव खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच राकेश उतेकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली. यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांच्यासह पोलादपूर पंचायत समितीचे अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहाणी करीत पंचनामा केला आणि रसायनाचे नमूने तसेच विहिरीतील पाण्याचे नमूने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. महाड औद्यागिक वसाहतीमधील केमिकल वेस्ट रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च हा अधिक असल्याने काही कंपन्यांकडून सीईटिपी यंत्रणेकडे सांडपाणी सोपविण्याऐवजी त्या सांडपाण्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचे काम टँकरचालकांकडे दिले जात असून त्यामुळेच नदीपात्रात तसेच दर्‍या-खोर्‍यांतून टँकरमधील केमिकल ओतण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, पोलादपूर पोलीसांकडून चौकशीचे सत्र सुरू असूनही कोणावरही गुन्हा दाखल होत नसल्याने याप्रश्नी पोलादपूरच्या प्रदूषणरहित पर्यावरणाला प्रदुषणाचे गालबोट लावण्याचा प्रकार करणार्‍यांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली.

 मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत केमिकल वाहून नेणारा टँकर रिकामा करण्याची तिसरी घटना 3 फेब्रुवारी 2020 रोजी मध्यरात्री 12च्या सुमारास घडली असता, गस्त घालणार्‍या पोलादपूर पोलिसांच्या जीपमधील पोलिसांनी टँकरमधील दोघांना घटनास्थळी पकडले. या दोघांना अटक करून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, आधीच्या दोन घटनांशी या टँकरचालकांचा संबंध आहे का, याची चौकशी केली जात आहे.

या घटनेतील टँकर (एमपी 33 एच 827) हा 2.25 लाख रुपये किमतीचा जुना वापरता असून टँकरमधील पीएसी हे केमिकल व टाकीसह 1.98 लाख रुपये असा एकूण 4.23 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील टँकर भरपूरसिंग ढाबा येथे उभा करण्यात आला आहे, मात्र तिथे आधीपासूनच उभा असलेला टँकर (क्रमांक एमएपी 09एफएच 9701) हाही जप्त करण्यात आल्याचे दिवसा दाखविण्यात आले. रात्री उपनिरीक्षक लोणे यांनी घटनास्थळी भेट दिली व सहायक निरीक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक दीपक जाधव अधिक तपास करीत असताना पहिल्या व दुसर्‍या घटनांनंतर गुन्हा दाखल का झाला नाही? तसेच तिसर्‍या घटनेत एक टँकर घटनास्थळी असताना दुसर्‍या टँकरचाही गुन्ह्यात समावेश का केला गेला, याचे पोलिसांकडून उत्तर घेण्यासाठी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवूण पोलादपूरकरांना या अनुत्तरीत प्रश्नाची उकल करून देणे गरजेचे आहे.

-शैलेश पालकर

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply