पनवेल : वार्ताहर
सीपी ऑफिसमध्ये नोकरीस असल्याचे सांगून पोलीस खात्यात नोकरी मिळवून देतो असे सांगून 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कामोठे येथे घडला आहे.
सेक्टर 14, कामोठे येथे सुहासिनी घोरपडे या राहतात. त्यांच्या इमारतीमध्ये भाडेकरू म्हणून राहणारा व्यक्ती मिलिंद कदम हा त्यांच्याकडे आला व तो सीपी ऑफिसमध्ये नोकरीला असल्याचे सांगून त्याची अशोक नाईक यांच्याशी ओळख असल्याचे सांगितले. त्यांच्या भाच्याला पोलीसमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी सव्वादोन लाख रुपये मागितले. या वेळी नोकरीची गरज असल्याने त्याचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला. त्यानंतर अशोक नाईक साहेबांना भेटण्यासाठी जात असून 25 हजार रुपये घेऊन त्याने बोलावले.
या वेळी घोरपडे यांनी 10 हजार रुपये दिले. त्यानंतर फोनवर संपर्क साधून त्यांच्याकडून कागदपत्रे व्हॉट्सअॅपला मागितले. त्यानंतर पुन्हा 10 हजार रोख त्याला देण्यात आले. त्यानंतर पुन्हा पाच हजार रुपयांची मागणी केली. या वेळी घोरपडे यांनी प्रथम साहेबांची भेट घालून द्या त्यानंतर पैसे देतो, असे सांगितले. घोरपडे पैसे देत नसल्याने त्याने त्यांच्या भाच्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घोरपडे यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper