कर्जत : बातमीदार
चोरीच्या गुन्ह्यातील खटला लवकरात लवकर निकाली काढून आरोपींना सजा देण्याच्या कार्यपद्दतीबद्दल महाराष्ट्र पोलीस दलातर्फे बुधवारी (दि.15) कर्जत न्यायालयातील सरकारी वकील अमर ननावरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नेरळ मोहाचीवाडी भागातील अनेक घरी सासू-सून असलेल्या दोन महिलांनी चोर्या केल्या होत्या. त्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात 30 नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या 13 गुन्ह्यातील दोन महिला आरोपींना पोलिसांनी 5 डिसेंबर रोजी मुद्देमालासह ताब्यात घेतले व कर्जत न्यायालयात हजर केले. सरकारी वकील अमर ननावरे यांच्या माध्यमातून हा खटला न्यायालयात जलदगतीने चालविण्यात आला. न्यायमूर्ती मनोद तोकले यांनी अवघ्या तीन दिवसात त्या आरोपी महिलांना दोषी ठरवत 8 डिसेंबर रोजी एक वर्षाची सक्तमजूरी आणि एक हजाराचा दंड सूनावला होता. या खटल्याच्या निकाल प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणारे कर्जत न्यायालयातील सरकारी वकील अमर ननावरे यांचा बुधवारी (दि.15) डिसेंबर रोजी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सत्कार करण्यात आला. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील पोलीस ठाण्यांचे वार्षिक इन्स्पेक्शन बुधवारी खालापूर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी सरकारी वकील ननावरे यांचा सत्कार केला. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, कर्जत उपाधीक्षक विजय लगारे ,नेरळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper