महाड ः प्रतिनिधी – राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांचे पुत्र अनिकेत याच्या कारला महाड येथे भीषण अपघात झाला. या अपघातात अनिकेत आणि चालक थोडक्यात बचावले अन्यथा कार सावित्री नदीत वाहून जाऊन मोठा अनर्थ झाला असता. याप्रकरणी चालक दोषी असतांनाही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
शुक्रवारी (दि. 26) प्रमोद घोसाळकर यांचे पुत्र अनिकेत प्रमोद घोसाळकर हे इनोव्हा कार क्रमांक (एमएच 06 पी यु 5995) ने दुपारी 1:00 वाजण्याच्या सुमारास महाडकडे येत असताना केंबुर्ली गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर चालकाच्या बेपर्वाइमुळे भरधाव वेगात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार संरक्षक कठडा तोडून एमएसईबीच्या 22 केव्हीच्या पोलवर जोरदार आदळली. ही धडक एवढी गंभीर होती की हा मजबूत पोलदेखील वाकला आणि कार सावित्रीच्या पात्रात जाता जाता थोडक्यात बचावली.
आज सकाळपासूनच महाडमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने सावित्री नदी धोक्याच्या पातळी ओलांडून वहात होती. या पोलला धडक बसल्याने कार नदीच्या पात्रात जाताना बचावली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या अपघातात अनिकेत आणि त्याचा चालक किरकोळ जखमी झाले असले तरी अपघातास कारणीभूत असलेल्या चालकावर महाड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच या अपघातात दासगाव 22 केव्ही विजवाहीनी नादुरुस्त झाल्यामुळे दुपारपासूनच दासगाव विभागातील बत्ती गुल झाली होती. वीजवितरण कंपनीच्या झालेल्या नुकसानीबाबत कोणतीही तक्रार झालेली नाही.
या 22 केव्हीचे खांब आणि वीजवाहीनी ही महामार्गाचे काम करणार्या एल अॅण्ड टी या ठेकेदाराने टाकले असून ती आजूनपर्यंत वीजवितरण कंपनीकेडे हस्तांतरित झालेली नाही. या वीजवाहीनी दुरुस्त करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून लवकरच दासगाव विभागातील वीजपुरवढा सुरळीत होईल.
-काशिनाथ शिंदे, उप कार्यकारी अभियंता महाड
RamPrahar – The Panvel Daily Paper