सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन
कर्जत ः बातमीदार – लॉकडाऊन काळात प्रवास करणार्या प्रवाशांची तिकिटे रेल्वेकडून रद्द करण्यात आली आहेत. त्या रद्द करण्यात आलेल्या तिकिटांचे पैसे आता परत केले जाणार होते. त्यामुळे कर्जत येथे आरक्षित तिकीट रद्द करून पैसे मिळविण्यासाठी प्रवाशांनी सकाळपासूनच आरक्षण केंद्रावर उपस्थिती दर्शविली होती. सुमारे 300 अर्जांद्वारे तिकिटे रद्द करण्यात आली. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आले. कोणतीही गडबड होऊ नये म्हणून कर्जत रेल्वे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनकडून यासाठी प्रयत्न केले जात होते. कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या प्रयत्नांना यश आले आणि कर्जत रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडकीवर 20 जूनपासून तिकीट रद्दीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. रेल्वे प्रशासनाने आधीच सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी ठरावीक अंतरावर मार्किंग केले होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरेश पवार यांनी आपल्या सहकार्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता. पहिल्याच दिवशी दिवसभरात 300हून अधिक अर्ज म्हणजे सुमारे 1800 तिकिटे रद्द करून प्रवाशांना त्यांचे पैसे परत देण्यात आले. वेळापत्रक जाहीर केले असूनही काही प्रवासी त्यांची तिकिटे रद्द करण्यासाठी आले होते. त्यांची तिकिटे 28 जून रोजी रद्द होणार होती, परंतु त्यांना परत न पाठवता बुकिंग क्लार्क कर्मचार्यांनी माणुसकी दाखवत त्यांची तिकिटे रद्द करून
त्यांना त्यांच्या तिकिटांचे पैसे परत दिले.
RamPrahar – The Panvel Daily Paper