एका कार्यक्रमासाठी झारखंडमध्ये जाण्याचा योग आला. देशातील मागासलेल्या बिहार राज्याचे विभाजन करून झारखंडची निर्मिती करण्यात आली. राजधानी रांचीमध्ये नवीन विधान भवन, मंत्रालय आणि शहराची उभारणी सुरू आहे. शहराच्या भोवती रिंग रोड आहे. आपल्या सारखाच पाऊस असूनही रस्ते चांगल्या अवस्थेत आहेत. रांची शहारामध्ये शेअर रिक्षा जास्त चालतात. त्यांची हद्द ठरलेली असते. त्या हद्दीत कोठेही उतरा सात रुपये भाडे घेतले जाते. विशेष म्हणजे रिक्षावाले नवख्या प्रवाशांना लुबाडताना दिसले नाहीत.आपल्या पनवेलमधून आलेल्या माझ्या सारख्याला नक्कीच त्या ठिकाणी चुकल्या सारखे वाटले.
मुंबईला येण्यासाठी हत्तीया एक्सप्रेसने निघालो. आमच्या बोगीत एका सिनेमाचे शूटिंग संपवून येणार्या युनिटची माणसे होती. एक मोठ्या कुटुंबांचा ग्रुप होता. गाडी सुटली आणि पुढच्याच स्टेशनवर अवाढव्य पत्नी आणि मध्यम नवरा असे एक बंगाली जोडपे चढले. त्या कुटुंबाने त्यांना पलीकडच्या कंपार्टमेंट मध्ये जाता का? आम्ही सहा जण एकत्र बसू शकतो असे विचारताच नवरा तयार झाला. पण त्यांना सोडायला आलेल्या त्यांच्या मुलाने सांगितले की तुम्ही दोघांनी इथेच सामोरासमोरच बसायचे दुसरीकडे जायचे नाही. मग त्या बाईने नवर्याकडे बघताच बिचारा काही न बोलता त्या ठिकाणी बसला. या बाईने सीटवर एक मोठी पिशवी ठेऊन त्या पलीकडे ती बसली. बाजूचे दोघे अंग चोरून कसेबसे बसले होते. दुपारचे 12 वाजत आले. त्या बाईने सीटवर बसलेल्यांना सांगितले तुम्ही उठा मला झोपायचे आहे. त्यांनी मग आम्ही कोठे बसायचे विचारले. तुम्ही पण झोपा नाहीतर काही करा मला झोपायचे आहे सांगितल्यावर त्यांनी नकार देऊन तुमच्या नवर्याला या बाजूला बसवा आम्ही चौघे समोर बसतो असे सांगताच बाईने, नाही माझा नवरा तिथेच बसणार तुम्ही काही करा. मी ज्येष्ठ नागरिक आहे. मला सरकारने ही जागा दिली आहे असा गोंधळ सुरू केला. मग टीसीला बोलावण्यात आले. त्याने सांगूनही बाई ऐकायला तयार नाही.
अनेकांनी समजवायचा प्रयत्न केला, पण बाई हट्टी. कोणाचे ऐकायलाच तयार नाही. तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना झोपायला जागा देत नाही म्हणत तिचा गोंधळ सुरू होता. या वेळी ती आपल्या नवर्याचे वय 70 वर्षे सांगत होती. समोरच्या कुटुंबात 75 वर्षाची व्यक्ती आहे समजताच लगेच तिने आपल्या नवर्याचे वय वाढवून 77 वर्षे सांगितले. नवरा सारखा तिला म्हणत होता नाही माझे वय 70 आहे. त्यामुळे सगळे प्रवासी हसायला लागले. अखेर त्या कुटुंबातील एकाने रेल्वेकडे तक्रार केली. मुख्य टीसीने येऊन समजावून संगितले की दिवसा तुम्हाला झोपता येणार नाही, पण ती ऐकायला तयारच नाही. आपल्या तोंडाचा पट्टा सुरूच. मी शाळेत मुख्याध्यापिका होते आताच निवृत्त झाले. माझे शंभर विद्यार्थी परदेशात आहेत, इत्यादी. अखेर पुढच्या स्टेशनवर पोलीस आले. पोलीस आल्यावर मात्र बाई गडबडली. मग तिने नवर्याला तिच्या पायाजवळ बसायला सांगितले. पुढे ती संपूर्ण प्रवासात शांत झाली, पण प्रवासात सगळ्यांना त्या बंगाली बाईचा विषय चर्चा करायला मिळाला. दुसर्या दिवशी रविवार असल्याने मुंबईत मेगाब्लॉक होता. ट्रेनला उशीर होत होता. म्हणून आम्ही कल्याण स्टेशनला उतरलो. ओला बोलावली. गाडी घेऊन चालक कल्याण रेल्वे स्टेशनजवळील रिक्षा स्टँडवर आला, पण आम्ही गाडीत बसत असताना रिक्षावाल्यांनी त्याला घेरला. या ठिकाणी प्रवासी का घेतोस म्हणून विचारणा सुरू केली. तोपर्यंत रिक्षावाल्यांनी गाडीला गराडा घातला. आमचे प्रवासी नेत असल्याचा रिक्षावाल्यांनी आरोप केला. त्यांना आम्ही पनवेलला जात असल्याचे सांगूनही ते ऐकत नव्हते. त्यांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीला हल्ली गार्ड असतात त्याला बोलावले. आम्ही गाडी घेऊन निघालो असता हे महाशय आले. त्यांनी गाडी समोर उभे राहून गाडीची चावी मागितली. ती न दिल्याने आणि रिक्षावाल्यांच्या पाठिंब्यामुळे या महाशयांना स्फुरण चढले. त्यांनी तू माझ्या अंगावर गाडी घातलीस असे ओरडत खिडकीतून हात घालून चालकाची मान पकडली रिक्षावाले खूश झाले. हे पाहून आपण महाराष्ट्रात आल्याची खात्री पटली. अखेर त्याला आपण पोलीस ठाण्यात जाऊ या सांगताच हे महाशय गाडीत बसले, पण घाबरून रिक्षावाल्यांना माझ्या मागे या नाहीतर हे पळवून नेतील, असे ओरडून त्याने सांगितले.
गाडीत बसल्यावर कोणत्या साहेबाकडे जायचे चल, असे सांगताच त्याने तुम्ही कसे त्यांना ओळखता विचारले आणि मग या महाशयांचा सूर बदलला. साहेब काय करणार हे रिक्षावाले ऐकत नाहीत त्यामुळे आमचा नाईलाज होतो. त्यांच्या समाधानासाठी सगळं करावं लागतं. आम्ही जवळच्या वाहतूक पोलीस चौकीत पोहचलो. त्याने मला साहेब रिक्षावाले सोबत आहेत म्हणून चालकाला आत नेतो आणि आणतो सांगितले. पाच मिनिटात चालक आला.त्या वेळी आपल्याकडील रिक्षावाल्यांची वागणूक पाहून परिवहन खात्याने आता तरी आपल्या डोळ्यावरील झापडं बाजूला करून रिक्षावाल्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे, असे वाटते.
-नितीन देशमुख, फेरफटका
RamPrahar – The Panvel Daily Paper