नागोठणे : प्रतिनिधी
प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मूलनाची जनजागृती करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, त्या करिता ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेलच. मात्र, या निर्मूलनाची सुरुवात प्रत्येक महिलेने आपल्या घरापासूनच करावी, असे आवाहन नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी केले.
नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांची ग्रामसभा सोमवारी (दि. 18) बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयाच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. धात्रक बोलत होते. उपसरपंच सुप्रिया महाडिक, ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र देशपांडे, अखलाक पानसरे, रंजना राऊत, भक्ती जाधव, कल्पना टेमकर, दिलनवाज अधिकारी, रोजाना बागवान, मीनाक्षी गोरे, मंगी कातकरी, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर आदींसह कर्मचारी आणि महिला या ग्रामसभेला उपस्थित होत्या.
बचत गटातील महिलांसाठी अनेक व्यवसाय उपलब्ध असून याची माहिती देण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, या बैठकीला सर्व बचतगटांच्या प्रतिनिधींनी न चुकता उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामविकास अधिकारी दिवकर यांनी केले. विकास योजनांसाठी महिलांनीसुध्दा मोलाचे सहकार्य करावे, अशी सूचना शैलेंद्र देशपांडे यांनी केली. प्रमोद चोगले यांनी आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper