Breaking News

फणसाडमधील वणवे रोखण्यासाठी विहूर ग्रामस्थांचे श्रमदान

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील फणसाड अभयारण्य आगीपासून संरक्षित रहावे, यासाठी विहूर ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करुन जंगल परिसरात वाढलेली झुडपे, सुके गवत, झाडाच्या सुक्या फांद्या, पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली.

फणसाड अभयारण्य आगीपासून संरक्षीत रहावे, अभयारण्यातील वृक्ष, वन्यजीव, पक्षी यांचे अस्तित्व व सुरक्षितता टिकून रहावी यासाठी अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जातात. या भागातील कधीही आग लागू नये यासाठी जनजागृती,  जाळीत रेषा काढणे अथवा सुकी झाडीझुडपे, गवत काढण्यासाठी लोकसहकार्यातून या ठिकाणी काम केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अरुण पाटील यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने विहूर धरण ते नवाबांचा राजवाडा या परिसरातील जंगलात वाढलेली झाडी-झुडपे, सुके गवत, झाडाच्या सुक्या फांद्या, सुका पालापाचोळा गोळा केला व त्याची योग्य ती विल्हेवाट लावली.

यासाठी विहूर गाव अध्यक्ष महेंद्र कदम यांनी गावातील 130 माणसे उपलब्ध करून दिली. त्यांनी श्रमदान करून फणसाड अभयारण्याला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. अभयारण्याचे कर्मचारी महेश माने, ज्ञानदेव सुभेदार, ज्ञानेश्वर कांबळे या श्रमदानात सहभागी झाले होते.

फणसाड अभयारण्य क्षेत्रात वणवा लागू नये,  जंगलातील सुके गवत व लाकडे एकत्र करणे गरजेचे होते. त्यासाठी विहूर ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांनी  खूप चांगला प्रतिसाद दिल्यामुळे अभयारण्य क्षेत्र वणव्यापासून सुरक्षित राहणार आहे. विहूर ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मोठे क्षेत्र वनव्यापासून सुरक्षित करण्यात यश आले आहे.

-अरुण पाटील, वनरक्षक,  फणसाड अभयारण्य, ता. मुरूड

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply