कर्जत : बातमीदार
माथेरान येथील एका झाडाची मोठी फांदी रविवारी (दि. 9) संध्याकाळी अचानक कोसळली. या फांदीखाली सापडून दोन महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर माथेरानच्या बी. जे. हॉस्पीटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बदलापूर येथे हलविण्यात आले आहे.
घराचे रंग काम सुरु असल्यामुळे माथेरान पंचशीला बंगला येथील विशाखा विजय पार्टे (वय 32) या शिक्षिका रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अंगणात मुलांची शिकवणी घेत होत्या. त्यावेळी आपल्या मुलाला शिकवणीला सोडवण्यासाठी निकीता विजेंद्र देशमुख (वय 27) या तिथे आल्या होत्या. याचवेळी अचानकपणे घरासमोरील झाडाची मोठी फांदी कोसळली. या घटनेत विशाखा पार्टे व निकीता देशमुख या दोन्ही महिला जखमी झाल्या. पार्टे यांच्या हातापायाला आणि पाठीला तर देशमुख यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली आहे. सुदैवाने शिकवणीला आलेली लहान मुले मात्र या दुर्घटनेतून बचावली.
RamPrahar – The Panvel Daily Paper