दिव्यांग मुलेसुद्धा करणार रॅम्प वॉक
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल स्मार्ट मम्मीज अर्थात पीएसएम या पनवेलमधील सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 17) सायंकाळी 4. 30 वाजता लहान मुलांसाठी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या फॅशन शोमध्ये दिव्यांग मुलेदेखील सहभागी होणार आहेत. शारीरिक कमतरतेवर मात मिळवत त्यांच्या ठायी विजिगीषू वृत्ती जागृत व्हावी या उद्देशाने दिव्यांग मुलांचा रॅम्प वॉक आयोजित करीत असल्याचे पीएसएमच्या संस्थापिका शीतल ठक्कर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, दिलीप पाटील, शुभांगी घरत, डॉ. कल्पना शेट्टे यांची उपस्थिती असणार, अशीही माहिती त्यांनी दिली.
या फॅशन शोची पूर्वतयारी म्हणून गुरुवारी सराव सत्र झाले. हा फॅशन शो पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. आयोजनाबाबत अधिक माहिती देताना कविता ठाकूर यांनी सांगितले की, मुलांच्यात आत्मविश्वास वाढीस लागावा हा आमचा आयोजनापाठचा मूळ हेतू आहे तसेच दिव्यांग मुलेदेखील कुठल्याही क्षेत्रात कमी नसतात हा सामाजिक संदेश देण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न असेल, तर संस्थापिका शीतल ठक्कर म्हणाल्या की, कोरोना विषाणूच्या आक्रमणामुळे जवळपास गेली दोन वर्षे मुलांच्या कुठल्याही अॅक्टिव्हिटीज होत नव्हत्या. शिक्षण, मनोरंजन, शारीरिक अभ्यासक्रम या सगळ्यांसाठी त्यांना ऑनलाइन माध्यमातून सामोरे जावे लागत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी एकत्र यावे आणि फॅशन शोमध्ये सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटले.
आमच्या संस्थेने यापूर्वी महिलांसाठी क्रिकेट लीग, ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पवॉक, पालकांसाठी फॅशन शो, चूल आणि मूल यात अडकलेल्या स्त्रीमधील उपजत गुणांना वाव देण्यासाठी विविध फॅशन शोजचे आयोजन केले आहे. रविवारी होणार्या दिव्यांग मुलांच्या फॅशन शोचा आनंद घेण्यासाठी आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनदेखील शीतल ठक्कर यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper