Breaking News

बँकेतील ठेवी की म्युच्युअल फंडांच्या डेट योजना?

बँक ठेव ठेवणे ही अतिशय सुरक्षित गुंतवणूक मानली जाते आणि ते बरोबरही आहे. पण ज्यांना त्यापेक्षा अधिक परतावा हवा आहे, त्यांनी थोडी अधिक जोखीम घेतली तर सध्या चांगला परतावा मिळू शकतो. डेट फंडाच्या योजनांमध्ये तुलनेने कमी जोखीम असते आणि काही चागल्या योजना परतावाही चांगला मिळवून देतात.
भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करणे, याला अधिक पसंती दिली जाते. पारंपारिकरित्या बँका, नावजलेल्या कंपन्या, सरकारी कंपन्या अशा अनेक ठिकाणी विविध मुदत ठेवींमध्ये भारतीय गुंतवणूकदार गुंतवणूक करत आलेला आहे. या मुदत/बचत ठेवींमधून मिळणारा निश्चित परतावा हे मुख्य आकर्षण गुतंवणूदारांना असते. निश्चित कालावधीमध्ये मिळणारा निश्चित परतावा हा या गुंतवणूक पर्यायाकडे वळण्यास खुणावत असतो. बहुतांशी गुंतवणूकदार या मुदतठेवी “अत्यंत सुरक्षित‘’व उत्तम पर्याय मानत आलेले आहेत. यामुळेच अशा ठेवींकडे गुंतवणूकदार कायमच आकर्षित होताना दिसतो.
मुदतठेवींमध्ये गुंतवणूक करत असताना पुढील काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करायला हवा.
मुदत ठेवींचे कमी होत असलेले व्याजदर
मुदत ठेवींवर मिळणारे व्याज गेल्या वीस वर्षात सोळा टक्केवरून जवळपास सहा टक्के दरापर्यंत खाली आले आहे. (याठिकाणी सरकारी बँकांच्या ठेवींवरील व्याजदर गृहित धरले आहेत.) सध्या या ठेवींवर मिळणारे व्याज हे महागाई दराएवढेच मिळत आहे. यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराची क्रयशक्ती (पर्चेसिंग पॉवर) नष्ट होत आहे. उदाहरणार्थ जर आज एका वस्तूला खरेदी करण्यासाठी रू. 100 द्यावे लागत असतील तर हीच वस्तू पुढील वर्षी 106 दराने उपलब्ध असणार आहे. (महागाई दर सहा टक्के गृहित धरला आहे.) सध्या गुंतवणुकीवर जर 6 टक्केच व्याज मिळत असेल तर आज गुंतवलेले रू. 100 पुढील वर्षी रू. 106 होणार आहेत. म्हणजेच गुंतवणुकदाराने गुंतवणुकीमधून कोणतीही कमाई केलेली नसणार. याचाच अर्थ मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराचे केवळ मुद्दल सुरक्षित राहिले परंतु त्यांना प्रत्यक्षात कोणताही परतावा मिळालेला नाही असा त्याचा अर्थ होतो.
बँकांचे व्यवस्थापन, खासगी कंपन्यांचे व्यवस्थापन
जर आपणास पतसंस्था किंवा सहकारी बँका, खासगी संस्था जादाचे व्याजदर देत असतील तर गुंतवणुकदारांनी सावधपणे गुंतवणुकीचा विचार करावा. कारण गेल्या काही दिवसांत काही पतसंस्था, सहकारी बँका व खासगी कंपन्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत आणि त्यामुळेच गुंतवणूकदारांचे व्याज व मुद्दल दोन्हीही धोक्यात आले आहे. अनेक सहकारी बँका, खासगी वित्त संस्थांचा एनपीए (दिलेल्या कर्जांची परतफेड न होण्याचे प्रमाण) सातत्याने वाढत आहे. यामुळे गुंतवणूकदाराच्या गुंतवलेल्या मुद्दलाबाबतच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुद्दलाबाबत निर्माण होणारा धोका हा वाढीव व्याजदरापेक्षा फार मोठा आहे.
वेगाने विकास करणार्‍या आपल्या देशात येणार्‍या काळात सातत्याने व्याजदर निश्चितच कमी होत जाणार आहे. कारण कमी व्याजदर देशाच्या प्रगतीला पूरक असतात. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, युरोपियन देश अशा विकसित राष्ट्रांमध्ये ठेवींवरील व्याजदर केवळ 1 ते 2 टक्केच असते. भारतही पुढील सात-आठ वर्षात विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल. म्हणजेच गुंतवणूकादारांना ठेवींवरील गुंतवणुकीवर मोठे व्याजदर मिळण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे. या गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये वृद्धी होऊ शकत नाही.
सुरक्षितरित्या व्याजदर जास्त कमावायाचा असेल गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांच्या लिक्विड योजनांचा विचार करावयास हवा. या गुंतवणूक पर्यायांमध्येही निश्चित जोखिम असते. परंतु अत्यंत कुशल व्यवस्थापन, पारदर्शकता व बाजार परिस्थितीनुसार वेळोवेळी केले जाणारे बदल गुंतवणूकदारांना बचतठेवींपेक्षा जास्त परतावा देऊन जात आहेत. प्रत्येक गुंतवणूकदाराची जोखिम घेण्याची क्षमता वेगवेवेळी असते. कारण प्रत्येकाचे उत्पन्न, गरजा वेगळ्या असतात. आर्थिक उद्दीष्टेही वेगळी असतात. दैनंदिन खर्च, मासिक उत्पन्न व भविष्यातील स्वप्ने प्रत्येक गुंतवणूकदाराप्रमाणे बदलतात. आपल्या जोखिम घेण्याच्या क्षमतेनुसार उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीतील वेळेनुसार प्रत्येक गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडातील योजनांची निवड करणे फायदेशीर ठरते. यासाठी आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घेणे व योग्य सल्ल्यानेच पैसे गुंतवणे भविष्यासाठी योग्य ठरेल.
बँकांमधील मुदतठेवी व म्युच्युअल फंडांची योजना यांची तुलना करताना नोकरी व व्यवसायातील तुलनेप्रमाणे करता येईल. नोकरी करणार्‍या व्यक्तीस नियमित ठराविक उत्पन्न पगाराद्वारे मिळत असते. परंतु व्यवसाय करणार्‍या व्यक्तीस मात्र त्याच्या मेहनतीप्रमाणे व व्यवसायातील संधींप्रमाणे दरमहा वेगवेगळा नफा कमावता येतो. नोकरीतील पगारास व बचत ठेवींतील उत्पन्नात फारसे मोठे बदल होत नाहीत. म्युच्युअल फंडातील परताव्याला सातत्य नसते आणि त्यामध्ये कायम बदल होत असतो. व्यवसाय व म्युच्युअल फंड योजनांमध्ये जोखिम जास्त असते. परंतु त्यामुळे परतावाही जास्त मिळण्याची शक्यता वाढते. तशी शक्यता मुदत ठेवींमध्ये मुळीच नसते.
मुदत ठेवी सुरक्षित आहेत, असे मानून ज्यांनी गुंतवणूक केली, त्यातील काहीजण गेल्या काही वर्षांत अडचणीत आलेले आपण पहातो. उदाहरणार्थ रूपी सहकारी बँक, शिवाजीराव भोसले सहकारी बँक, आयएल अँड एफएस, झी एन्टरप्रायजेस, दिवाण हौसिंग इत्यादी अनेक वित्तीय संस्था आणि बँका अडचणीत आलेल्या आहेत. ठेवींमधील जोखिम वाढत आहे. परंतु परतावा वाढण्याची शक्यता जवळपास नाही, अशी स्थिती आहे. किंबहुना मुद्दलही जाण्याची जोखिम वाढत आहे.
मुदत ठेवींवरील व्याजाचा गुंतवणूकदाराच्या मूळ उत्पन्नात समावेश होत असल्याने या व्याजदरावर भरावा लागणार्‍या प्राप्तीकराचे प्रमाणही जास्त आहे. परंतु म्युच्युअल फंडातील डेट योजनांवरील नफ्यावर प्राप्तीकर कमी आकारला जातो. जर गुंतवणूकदाराकडे पाच वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी असेल तर म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांचाही निश्चित विचार करावयास हवा. या योजना गुंतवणुकीसाठी आकर्षक व सुलभ पर्याय ठरू शकतात. पारदर्शकता, तरलता, कुशल व्यवस्थापन, आकर्षक परतावा असे अनेक फायदे म्युच्युअल फंडातील योजनांमधून गुंतवणूकदारास मिळत आहेत. हे फायदे आपणांस मुदतठेवी किंवा बचत ठेवींमध्ये मिळू शकणार नाहीत.

म्युच्युअल फंडाच्या काही चांगल्या डेट योजना
(किती परतावा मिळू शकतो हे दर्शविण्यासाठीची उदाहरणे)
*  JM² Low Duration Fund Direct Plan-Growth (एका वर्षाचा परतावा 24.63 टक्के)
*  HDFC Credit Risk Debt Fund Direct-Growth (एका वर्षाचा परतावा 11.91 टक्के)
* ICICI Prudential Credit Risk Fund Direct Plan-Growth (एका वर्षाचा परतावा 10.35 टक्के)
*  ICICI Prudential -ll Seasons Bond Fund Direct Plan-Growth
    (एका वर्षाचा परतावा 8.11 टक्के)
सध्या परतावा देणार्‍या या योजना आहेत. जेव्हा आपण गुंतवणुकीचा निर्णय घेतो, तेव्हा चांगल्या  सल्लागाराला विचारूनच अशा योजनांची निवड केली पाहिजे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply