बंदुकीसह जिवंत काडतुसाची तस्करी करणारे त्रिकूट गजाआड

अलिबाग : प्रतिनिधी
गावठी बनावटीच्या बंदूकीसह चार जिवंत काडतुसांची बेकायदेशीररित्या तस्करी करणार्‍या त्रिकुटाला अलिबाग पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग-पेण मार्गावरील पिंपळभाट परिसरात एक जण बंदुकीसह जिवंत काडतूस विकण्यासाठी येणार असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. डी. कोल्हे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. उपनिरीक्षक खरात, सहाय्यक फौजदार अनिल सानप, नाईक अक्षय जाधव, शिपाई सुनील फड यांच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचला. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोयनाडमधून एक जण दुचाकीवर आला. पथकाने छापा टाकून त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे बंदूकीसह चार जिवंत काडतुसे आढळली. या गुन्ह्यात सामील असलेल्या आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी मोहसीन मोमीन शेख (रा. पोयनाड), गौरव पाटील (रा. ढोलपाडा) आणि विनेश प्रभाकर पाटील (रा. लेंडी-कामार्ले) या तिघांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांपैकी शेख हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात रेवदंडा, पोयनाड व मुरूड पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply