औरंगाबाद : प्रतिनिधी
बचत गटातील प्रत्येक महिलेला स्वत:चा रोजगार सुरू करण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी मुद्रा योजनेंतर्गत एक लाखाचे कर्ज देण्यात येईल, तसेच जनधन खाते असलेल्या महिलांना खात्यात पैसे नसले तरी पाच हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल. त्यामुळे त्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 7) येथे स्पष्ट केले. शेंद्रा येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑरिक सिटीचे लोकार्पण करण्यात आले. त्या वेळी त्यांनी ही घोषणा केली.
‘सर्व माता-भगिनींना माझा नमस्कार. आज गौरी, महालक्ष्मी विसर्जनाचा दिवस असतानासुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल खूप खूप आभार. आज आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंतीसुद्धा आहे. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो’, अशी मराठी भाषेतून सुरुवात करीत पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. ऑरिस सिटीच्या माध्यमातून औरंगाबादमध्ये अनेक कंपन्या येतील. त्यामुळे मराठवाड्यातील तरुणांना रोजगार मिळेल, असेही ते म्हणाले.
शौचालय आणि पाणी या महिलांच्या दोन प्रमुख समस्या असल्याचे ज्येष्ठ समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी 70च्या दशकात संसदेत सांगितले होते. या समस्या सोडवल्या तर महिलांचाही देशाच्या प्रगतीला हातभार लागेल, असेही लोहिया म्हणाले होते. लोहिया गेले. त्यानंतर अनेक सरकारे आली आणि गेली, मात्र या समस्या काही सुटल्या नाहीत, पण आम्ही सत्तेत येताच या समस्या सोडवण्यावर भर दिला असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पाण्यासाठी केंद्र सरकारने नवीन मंत्रालय सुरू केले असून, पाण्यासाठी साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याच्या महिला व बालककल्याण मंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper