
कोंडके, दादा मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी कलावंत; अत्यंत लोकप्रिय विनोदी अभिनेते. त्यांचे मूळ नाव कृष्णा खंडेराव कोंडके; मात्र ‘दादा कोंडके या नावाने ते सुपरिचित. त्यांचा जन्म नायगाव, मुंबई येथला. त्यांची जन्मतारीख निश्चित माहीत नसल्याने जन्मदिनी जन्माष्टमी होती, म्हणून तिथीवरून जन्मतारीख काढण्यात येऊन त्यांचे नाव कृष्णा ठेवण्यात आले. त्यांचा आज मृत्यूदिन. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी या लेखात जाणून घेऊया. बालवयातच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले. त्यांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. घरात सतत भजने होत असल्यामुळे त्यांना गीतलेखन व गायनाचे कौशल्य अवगत झाले. ते अनेक वाद्येही वाजविण्यास शिकले. बालपणापासूनच खोडकर स्वभावाच्या दादांचे शिक्षणात मात्र फारसे मन रमले नाही. त्यामुळे त्यांचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मुंबईतच श्रीकृष्ण बँड पथकात वादकाचे काम केले. याच काळात त्यांचा विविध सामाजिक चळवळींशी संपर्क आला. त्यातूनच ते राष्ट्र सेवा दलाशी जोडले गेले. अंगच्या उपजत कलागुणांमुळे त्यांना राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात काम मिळाले. तेथे ते शाहीर म्हणून नावारूपास आले. वगनाट्यात भूमिका करणे, पोवाडे रचणे व गाणे आदी कामे करू लागले. या काळात राम नगरकर, निळू फूले आदी कलाकार त्यांचे सहकारी होते. वगसम्राट दादू इंदुरीकरांच्या शैलीचा त्यांच्यावर प्रभाव होता. वसंत सबनीसलिखित छपरी पलंगाचा वग हे लोकनाट्य त्यांनी विच्छा माझी पुरी करा या नावाने रंगमंचावर आणले. या नाटकाला असलेला लोकनाट्याचा बाज, तत्कालीन राजकीय-सामाजिक संदर्भ व त्यांवर औपरोधिक, मार्मिक भाष्याची, विनोदी टीका-टिप्पणीची खुमासदार फोडणी यांमुळे हे लोकनाट्य अतिशय लोकप्रिय झाले. या लोकनाट्यातील त्यांची भूमिका अतिशय गाजली व ते प्रसिद्धीच्या झोतात आले. मराठी रंगभूमीवर दादांना मिळालेले यश पाहून सुप्रसिद्ध चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी दादांना त्यांच्या तांबडी माती (1969) या चित्रपटात सहनायकाची भूमिका दिली; मात्र हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही. रंगमंचावर हजारो प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा अभिनेता सिनेमाच्या पडद्यावर लोकांना का आवडला नाही, असा प्रश्न भालजी पेंढारकरांना पडला होता. पुढे पेंढारकरांच्या अचूक मार्गदर्शनामुळे दादांनी सोंगाड्या (1971, दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी) या चित्रपटाची निर्मिती केली. अत्यंत साधे कथानक, ठसकेबाज, ग्रामीण बाजाची गाणी, विनोदी सादरीकरण यांमुळे दादांचे चित्रपट प्रेक्षकांना आवडले. मराठीतही चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक आहे, हे दादांच्या चित्रपटांनी दाखवून दिले.
RamPrahar – The Panvel Daily Paper